उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आता काँग्रेसने आणखी एक पाऊल उचललं आहे. काँग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी तपशीलवार तथ्य सादर करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाची नेमणूकीची मागणी करणार एक निवेदन काँग्रेसने राष्ट्रपतींना दिलं आहे. काँग्रेसच्या या शिष्टमंडळात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार ए. के. अँटनी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी, खासदार के.सी.वेणुगोपाल आणि खासदार अधीर रंजन चौधरी या नेत्यांचा समावेश असेल असं काँग्रेसच्या निवेदनात म्हणण्यात आलं आहे.

“लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांसोबत दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाची घटना धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशच्या या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. त्याहूनही दुःखद बाब म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दिलेला खुला इशारा. अजय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलगाच हे वाहन चालवीत होता. दरम्यान सर्व स्तरांतून तीव्र निषेध आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करूनही अद्याप दोषीवर किंवा संबंधित मंत्र्याविरुद्ध कोणतीही निर्णायक, ठोस कारवाई झालेली नाही. म्हणूनच, या प्रकरणी तथ्याचं तपशीलवार निवेदन सादर करण्यासाठी कॉंग्रेसचं शिष्टमंडळ लवकरात लवकर तुमच्या भेटीची मागणी करत आहे”, असं काँग्रेसच्या निवेदनात म्हणण्यात आलं आहे.

राहुल गांधींचा लखीमपूर दौरा म्हणजे निव्वळ ‘राजकीय पर्यटन’; भाजपाची टीका

आधी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा!

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून मिश्रा यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “मुलाला अटक आणि तरीही वडील मंत्रिपदावर कायम कसे?” तरमाजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह म्हणाले, “आरोपी आशीष मिश्रा उर्फ मोनूला शिक्षा होण्यासाठी आधी मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवलं पाहिजे.”

११ तासांच्या चौकशीनंतर आशीष मिश्राला अटक

लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राने निर्दोष आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या वाहनाने चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष ऊर्फ मोनूला शनिवारी (९ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता युपी पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर करण्यात आलं आणि ११ तासांच्या चौकशीनंतर आशीष मिश्राला अखेर आठवड्याभराने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर देशात संतापाची लाट उसळली होती.