पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नक्षलवादासंबंधी लोकसभेत केलेल्या भाषणाची काँग्रेसने खिल्ली उडवली. ‘‘आपला आवडता अपशब्द न वापरता गृहमंत्र्यांनी ९० मिनिटे बडबड केली हा एक चमत्कारच होता,’’ अशा शब्दांत काँग्रेसने शहा यांना प्रत्युत्तर दिले. गेल्या वर्षाी डिसेंबरमध्ये शहा यांनी सभागृहातील चर्चेवेळी आक्षेपार्ह शब्द वापरला होता, याची काँग्रेसने आठवण करून दिली.
नक्षवाद्यांचे सर्वोच्च संघटना आणि केंद्रीय रचना जवळजवळ पूर्णपूणे मोडून काढल्याने देश नक्षलवादमुक्त झाल्याचा दावा अमित शहा यांनी आपल्या भाषणात केला होता. त्याशिवाय नक्षलवाद्यांना आळा घालण्यासाठी काँग्रेसने काहीही केले नाही, असा दावाही त्यांनी केला होता. काँग्रेसने हे दोन्ही दावे फेटाळून लावले. गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसने नक्षलविरोधी रणनीती आखत सातत्याने कारवाया केल्या आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ऑक्टोबर २०११ मध्ये झारखंडच्या समृद्ध वनक्षेत्रात सुरू करण्यात आलेली सारंडा कृती योजना हा एक ‘निर्णायक टप्पा’ होता, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात के. विजय कुमार हे गृह मंत्रालयात सुरक्षा सल्लागार होते. अतयंत प्रतिष्ठिक असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याला यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी एका मुलाखतीत दोन दशकांतील नक्षलविरोधी रणनीती आणि कारवायांमध्ये असलेले सातत्य उघड केले. झारखंडच्या समृद्ध वनक्षेत्रात ऑक्टोबर २०११ मध्ये सुरू करण्यात आलेली सारंडा कृती योजना हा एक परिवर्तनकारी उपक्रम होता, ज्याने एक असे मॉडेल प्रदान केले जे इतरत्रही स्वीकारले गेले, असे ते म्हणाले होते, असे रमेश यांनी सांगितले.
रमेश यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये तत्कालीन झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांना लिहिलेले आपले पत्रही समाज माध्यमावर प्रसारित केले.
प्रकरण काय?
डिसेंबर २०२५ मध्ये लोकसभा अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास ठरावावर झालेल्या चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेपार्ह शब्द वापर होता. त्यावर तीव्र टीका झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षांना हा शब्द कामकाजातून वगळण्याची विनंती केली. हा शब्द वगळण्यात आल्यानंतरही विरोधी पक्षांनी शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. ठरावावरील दोन दिवसांच्या चर्चेच्या शेवटी गृहमंत्री आपले भाषण संपवत असताना, विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहाच्या मध्यभागी धावून आले आणि त्यांनी निषेध करत घोषणाबाजी केली.
