नवी दिल्ली : गलगोटियास विद्यापीठाची फसवेगिरी बुधवारी चर्चेत आल्यानंतर केंद्र सरकारच्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या आयोजनावर काँग्रेसने पुन्हा टीका केली. ‘भारताच्या प्रतिभेचा आणि विपूल माहिती-विदाचा लाभ घेण्याऐवजी ‘एआय समिट’ हा एक अनियोजित ‘पीआर’ तमाशा आहे. भारतीय माहिती-विदा विक्रीला काढला आहे आणि चिनी उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत’, अशी परखड टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही याआधी केंद्र सरकार ‘पीआर भुकेले’ असल्याचा आरोप केला होता.
‘‘मोदी सरकारने एआयच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताची थट्टा केली आहे. सध्या सुरू असलेल्या एआय शिखर परिषदेत, चिनी रोबोला आपले असल्याचे दाखवले जात आहे. चिनी माध्यमांनी आमची थट्टा केली आहे. हे भारतासाठी खरोखरच लाजिरवाणे आहे,’’ अशी टीका काँग्रेसने ‘एक्स’वरून केली. ‘‘लज्जास्पद गोष्ट म्हणजे मोदींचे मंत्री अश्विनी वैष्णव या चिनी रोबोचा प्रचार करण्यात गुंतले होते. मोदी सरकारने देशाच्या प्रतिमेचे कधीही भरून न येणारे नुकसान केले आहे. आपण आपल्या माहिती-विदाच्या ताकदीवर जागतिक नेते होऊ शकतो, पण केंद्र सरकारने ‘एआय’ला एक विनोद बनवले आहे. हा निर्लज्जाचा कळस झाला, अशी टीकाही काँग्रेसने केली.
विद्यापीठाची सारवासारव, नंतर माफी
वादात सापडल्यानंतर गलगोटियास विद्यापीठाने सुरुवातीला ‘रोबो डॉग’ ही आमची निर्मिती होती, असा दावा केलाच नव्हता, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र चहूबाजूने टीका होऊ लागल्यानंतर विद्यापीठाने माफी मागितली. या माफीनाम्यामध्ये विद्यापीठाच्या प्रतिनिधीने घाईघाईने ‘खोटी माहिती’ दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
“विद्यापीठाच्या मंडपाचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रतिनिधींपैकी एकाने अधिकृत परवानगी न घेता प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. या प्रतिनिधीने चुकीची माहिती दिली. प्रदर्शनातील उत्पादनाच्या तांत्रिक बाबींची तिला माहिती नव्हती. कॅमेऱ्यासमोर उत्साहाच्या भरात प्रतिनिधीने चुकीची माहिती दिली,” असे निवेदनात म्हटले आहे. या नवोपक्रमाबद्दल दिशाभूल करण्याचा संस्थेचा कोणताही हेतू नव्हता, अशी सारवासारव विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.‘एआय समिट’च्या आयोजकांच्या आदेशानुसार आम्ही समिटच्या परिसरातून निघून जात आहोत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय संस्थांची मेहरबानी
– गलगोटियास विद्यापीठाला २०२२ मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) ‘ए प्लस’ मानांकन देण्यात आले.
– हे मानांकन पाच वर्षांसाठी वैध असते. शिक्षक, पायाभूत सुविधा आणि उद्योग-चालित अभ्यासक्रम यासारखे राष्ट्रीय मापदंड ही शैक्षणिक संस्था पूर्ण करते असा या मानांकनाचा अर्थ होतो.
– ‘नॅक’ने या विद्यापीठाला ४ पैकी ३.३७ इतके गुणे दिले. ते उत्तर प्रदेशातील सर्वोच्च गुण मिळवणारे एकमेव खासगी विद्यापीठ ठरले आहे.
– ‘नॅक’बरोबरच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ (एनबीए), बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय), फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) सदस्यत्व, भारतीय नर्सिंग परिषद (आयएनसी), द इंडियन असोसिएशन ऑफ फिजियोथेरपिस्ट्स (आयएपी) अशा विविध संस्थांनी गलगोटियास विद्यापीठाला मान्यता दिली आहे.
– विद्यापीठाला ‘यूजीसी-१२बी’ दर्जा मिळाला असल्याने हे विद्यापीठ केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग आणि निधीपुरवठा करणाऱ्या इतर केंद्रीय संस्था यांच्याकडून अनुदान मिळण्यास पात्र ठरले आहे.

