पीटीआय, नवी दिल्ली :“भारताच्या १४० कोटी नागरिकांचा आपल्याला पाठिंबा आहे, असे विधान करून इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी भारतीय सभ्यतेच्या मूल्यनिष्ठांचे उल्लंघन केले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर बाळगलेले मौन हे सद्सद्विवेकबुद्धीला धरून नाही,” अशी टीका काँग्रेसने सोमवारी केली. ‘जगामध्ये अमेरिका हा इस्रायलचा एकमेव पाठिराखा देश उरला आहे,’ अशी टिप्पणी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी केली होती. त्याला उत्तर देताना, आपल्याला भारतीय नागरिकांचा प्रंचड पाठिंबा आहे, असे नेत्यानाहू म्हणाले होते.
नेत्यानाहू यांच्या विधानावर केंद्र सरकार किंवा पंतप्रधानांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, यावरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला. तसेच मोदींचा उल्लेख त्यांनी ‘स्वयंघोषित, पुरस्कारांची हाव असलेले विश्वगुरू’ असा केला. रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून मोदींवर टीका करताना इस्रायललाही लक्ष्य केले. इस्रायलने गाझा, वेस्ट बँक, इराण, लेबनॉन येथे घडवलेला हिंसाचार आणि त्यामध्ये हजारो लोकांची झालेली जीवितहानी याकडे रमेश यांनी लक्ष वेधले.
इस्रायलच्या इराण आणि लेबनॉनविषयीच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिकेला इराणबरोबर शस्त्रसंधी वाढवून कायमस्वरूपी शांतता करण्यासाठी वाटाघाटी करताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नेतान्याहू यांना खडसावले होते. त्या पार्श्वभूमीवर, अनेक इस्रायली नेते अमेरिका-इराण कराराला विरोध करताना ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत. त्याबद्दल विचारले असता व्हान्स म्हणाले, “जर मी इस्रायलच्या मंत्रिमंडळात असतो तर संपूर्ण देशात आपल्या एकमेव शक्तिशाली मित्रदेशावर टीका केली नसती.” त्यावर ‘फॉक्स न्यूज’शी बोलताना नेत्यानाहू म्हणाले की, “आम्हाला भारतासारख्या छोट्या देशांसह अन्य काही देशांचाही पाठिंबा आहे. भारतात १४० कोटी लोक आहेत आणि तिथे आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळतो.” नेत्यानाहू यांच्या या विधानाचे भारतात पडसाद उमटत आहेत.
नेत्यानाहू यांचे म्हणणे चूक आहे. निःसंशयपणे इस्रायल हा देश मोदी आणि अदानी साम्राज्याचाच भाग आहे आणि नरेंद्र मोदी हे अंधपणे त्यांची भक्ती करतात. पण इस्रायलने गाझामध्ये केलेल्या वंशसंहाराचा आणि बळकावलेल्या वेस्ट बँकेतून पॅलेस्टिनींना विस्थापित करण्याच्या कृतीचा कोट्यवधी भारतीय निषेध करतात. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
पारपत्र निर्देशांकावरून लक्ष्य
‘जागतिक पारपत्र निर्देशांक २०२६’मध्ये भारताच्या पारपत्राचे स्थान १२५व्या क्रमांकावर घसरल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या धोरणांमुळे जागतिक पातळीवर देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे. भारतीय पारपत्राला आता प्रतिष्ठा आणि मजबुती मिळाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी २०१८मध्ये केला होता. ही ताकद कुठे दिसत आहे, असा प्रश्न खरगे यांनी विचारला.
