काँग्रेस हायकमांडने एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. देशातील ६ राज्यांचे प्रभारी काँग्रेसने बदलले आहेत. आसाम, पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यात काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल केले आहेत.

राजस्थानमधील काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यावर आता काँग्रेस हायकमांडने मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेश बघेल यांच्या जागी सचिन पायलट यांची पंजाबचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच आता भूपेश बघेल यांच्याकडे आसामची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, म्हणजे भूपेश बघेल हे आता आसाम काँग्रेसचे नवे प्रभारी असणार आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षाने अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक निवेदन प्रसिद्ध करत या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी?

महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून डॉ.सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.सिरिवेल्ला प्रसाद हे अर्थतज्ञ असून दलित नेते आहेत. तमिळनाडू आणि झारखंड राज्याचे सहप्रभारी म्हणून त्यांनी याआधी काम केलेलं आहे. तसेच २०१९ मध्ये डॉ.सिरिवेल्ला प्रसाद यांनी आंध्र प्रदेशमधील ओंगाले या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती.

कोणत्या ६ राज्यांचे प्रभारी बदलले? वाचा!

काँग्रेस हायकमांडने संघटनात्मक फेरबदल केले आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच छत्तीसगडचे प्रभारी म्हणून सुखदेव भगत यांची नियुक्ती केली आहे. तसेच महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून डॉ.सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे प्रभारी म्हणून पी.व्ही. मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंजाबचे प्रभारी म्हणून सचिन पायलट यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आसामचे प्रभारी म्हणून भूपेश बघेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आणि काँग्रेसमधील संघटनात्मकबाबींवरून पंजाबमध्ये अंतर्गत कलह आणि गटबाजीच्या बातम्या सातत्याने आल्याच्यानंतर काँग्रेस हायकमांडने पंजाबमधील पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. त्या अनुषंगाने भूपेश बघेल यांच्याकडील पंजाबच्या प्रभारी पदाची जबाबदारी काढून घेत आता सचिन पायलट यांच्यावर ती जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंजाब दौऱ्यापूर्वीच सचिन पायलट यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच पंजाब दौरा करण्याची शक्यता आहे.