मोदींचा काँग्रेसला सवाल

तिहेरी तलाक या अमानुष प्रथेविरुद्ध केंद्र सरकार करीत असलेल्या कायद्याला काँग्रेसने विरोध दर्शविला आणि आता ते महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी कशा काय करू शकतात, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसला केला.

कर्नाटकमधील विजयपुरा येथे प्रचारसभेत मोदी पुढे म्हणाले की, कर्नाटकमधील महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचे सरकार काहीही करीत नाही. तर केंद्रातील भाजपच्या सरकारने मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेतला. मुलगी कोणत्याही जाती-धर्माची असो ती मुलगीच असते, त्यामुळे मुस्लीम मुलींना तिहेरी तलाकच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी भाजपने कायदा केला, मात्र काँग्रेसने हा कायदा मंजूर होऊ दिला नाही, असे मोदी म्हणाले. या प्रचारदौऱ्यात मोदींनी अनेक घोषणा केल्या. राज्यात भाजपचे सरकार आल्यास अन्नप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येईल, येथे फलोत्पादनाला प्राधान्य दिले जाईल, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांसाठी एका लाख रुपयांच्या विम्याची घोषणाही मोदींनी केली.

कर्नाटकमध्ये असा कोणता मंत्री आहे की ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, सिंचन घोटाळ्याची माहिती घराघरांत पोहोचली आहे, ठेकेदारांशी त्यांचे कोणते नाते आहे, हे ठेकेदार कोणाच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून फिरत होते, आदी सवालही या वेळी मोदींनी केले. कर्नाटकमध्ये दुष्काळ पडलेला असताना तेथील मंत्री दिल्लीत राजकारण करीत होते, असेही मोदी म्हणाले.