नवी दिल्ली : देशातील नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) सुरू आहे. यादरम्यान किमान १५ मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा (बीएलओ) मृत्यू झाल्यावरून काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. ‘एसआयआर’ ही सुधारणा नसून लादलेला जुलूम आहे, तसेच नागरिकांचा छळ करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली चाल आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

‘बीएलओं’चा मृत्यू हा अनावश्यक दबावामुळे झालेला असून त्याकडे आनुषंगिक नुकसान म्हणून दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका काँग्रेसने केली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी एका हिंदी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी ‘एक्स’वर प्रसिद्ध करत, ‘एसआयआर’च्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“निवडणूक आयोगाने अशी व्यवस्था निर्माण केली आहे, ज्यामध्ये नागरिकांनी २२ वर्षे जुन्या मतदारयाद्यांच्या हजारो पानांमध्ये स्वतःचे नाव शोधावे लागत आहे. याचा उद्देश स्पष्ट आहे – खऱ्या मतदारांना बाहेर ठेवणे आणि बनावट मतदारांना कायम ठेवणे,” अशी टीका राहुल यांनी केली.

सहा राज्यांमध्ये किमान १५ मृत्यू

‘एसआयआर’च्या अंमलबजावणीदरम्यान गेल्या १९ दिवसांमध्ये सहा राज्यांमध्ये किमान १५ ‘बीएलओं’चा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी चार, पश्चिम बंगालमध्ये तीन तर राजस्थान, केरळ आणि तमिळनाडू येथे प्रत्येकी एका ‘बीएलओ’चा मृत्यू झाला आहे. यापैकी किमान दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला तर किमान चौघांनी आत्महत्या केली.

देशभरात ‘एसआयआर’च्या नावाखाली गोंधळ निर्माण करण्यात आला आहे. परिणाम? तीन आठवड्यांमध्ये १६ ‘बीएलओं’नी प्राण गमावले आहे. हृदयविकाराचा धक्का, तणाव, आत्महत्या… ‘एसआयआर’ ही सुधारणा नाही, तो लादलेला जुलूम आहे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

भाजप चोरलेल्या सत्तेची फळे खाण्यात मग्न आहे, तर निवडणूक आयोग मूक प्रेक्षक होऊन पाहत आहे. ‘एसआयआर’ची घाईघाईने, विनानियोजन, जबरदस्तीने अंमलबजावणी करणे हा प्रकार निश्चलनीकरण आणि कोविड-१९ टाळेबंदीची आठवण करून देणारा आहे. मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस