नवी दिल्ली : गेल्या वर्षी झालेल्या लखीमपूर-खेरी येथील हिंसाचारात अनेकांचा बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसने सोमवारी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा आतापर्यंत मंत्रिपदी राहणे, हा मृतांचा अपमान असल्याचे काँग्रेसने सोमवारी म्हटले आहे.

पक्षाचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ‘ट्विट’ केले, की, एक वर्ष उलटले, पण लखीमपूर खेरीतील शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. कारण एकच – नेहमीप्रमाणे भाजप गुन्हेगारांना संरक्षण देत आहे. जेव्हा आम्ही ‘भारत जोडो यात्रा’ करण्याचा निर्णय घेतला, त्यामागे ही शेतकरी चळवळ आमच्यासाठी मोठी प्रेरणा होती. शेतकरीरूपी ‘अन्नदात्या’ला न्याय दिल्याशिवाय हा संघर्ष संपणार नाही.

पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाद्रा यांनी ‘ट्विट’ केले, की लखीमपूर शेतकरी हत्याकांडाने भाजप सरकारचा शेतकरीविरोधी चेहरा उघड केला आहे. वर्षभरानंतरही सत्तेच्या सुरक्षेमुळे दोषींचे मंत्रिपद कायम आहे. या प्रकरणी सुनावणी संथ गतीने सुरू असून, पीडित कुटुंबीय निराश झाले आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षांनंतरही शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले, की लखीमपूर खेरी हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान येथे अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. मोदी सरकारच्या एका मंत्र्याचा या कटात सहभाग होता. आजही ते मंत्री मंत्रिमंडळात आहेत. ‘काळय़ा कायद्यां’विरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मात्र नाहक बळी गेला. यापेक्षा लाजिरवाणे काहीही असू शकत नाही.

२६ नोव्हेंबरला देशभर निदर्शने : टिकैत

लखीमपूर खेरी : भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सोमवारी लखीमपूर खेरी दुर्घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त सांगितले, की, लखीमपूर खेरीची घटना शेतकरी विसरलेले नाहीत व ते सरकारला विसरू देणार नाहीत. या संदर्भात केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रांच्या हकालपट्टीशिवाय कोणताही पर्याय स्वीकारला जाणार नाही. संयुक्त किसान मोर्चातर्फे २६ नोव्हेंबरला देशव्यापी निदर्शने केली जातील. , या निदर्शनांत लखीमपूर खेरी घटनेचा मुद्दाही उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त तिकुनिया भागातील कौडियाला घाट गुरुद्वारा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात टिकैत सहभागी झाले. या हिंसाचारात मृत्यमुखी पडलेले शेतकरी व पत्रकारांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.