रशियाच्या मॉस्को येथील विमानतळावर भारतीय राष्ट्रगीताची धून वाजविली जात असताना एकाच जागेवर उभे न राहता मानवंदना स्विकारण्यासाठी चालत राहिल्याची चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घडली. त्यामुळे आता काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सततच्या परदेश दौऱ्यांमुळे मोदींनी परदेशात इतका काळ घालवलाय की, बहुधा त्यांना राष्ट्रगीताचा विसर पडला असावा. या अभूतपूर्व घटनेमुळे देशाच्या भावना खोलवर दुखावल्या गेल्या आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते मनिष तिवारी मोदींवर टीका केली. मोदींचे हे कृत्य भारतीय राष्ट्रध्वजासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘राष्ट्रवाद भाजप \मोदी “ईस्टाईल”, यावर मोदीभक्तांचे काही म्हणणे आहे का?’, असा उपरोधिक सवाल करत काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनीदेखील मोदींना लक्ष्य केले.

मॉस्कोत राष्ट्रगीत सुरू असताना नरेंद्र मोदींना चालताना पाहून देशातील नागरिकांना धक्का बसला असून ते दुखावले गेले आहेत. हा राष्ट्रीय संवेदनांचा मुद्दा असून जेव्हा पंतप्रधान परदेशात देशाचे प्रतिनिधित्त्व करतात तेव्हा या संवेदनांचा आदर राखला जाणे अपेक्षित आहे, असे माजी कायदेमंत्री अश्वानी कुमार यांनी सांगितले.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या शिखर बैठकीसाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉस्कोत आगमन झाले. त्यांच्या आगमनच्यावेळी विमानतळावर भारतीय राष्ट्रगीताची धून वाजविण्यास सुरूवात झाली. मात्र, एका रशियन अधिकाऱ्याच्या हातवाऱ्यांमुळे मोदींचा चुकीचा समज झाला आणि त्यांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ एका जागेवर उभे न राहता मानवंदना स्विकारण्यासाठी चालण्यास प्रारंभ केला. ही चूक ध्यानात आल्यानंतर एका रशियन अधिकाऱ्याने मोदींना पुढे जाण्यापासून रोखले आणि शिष्टाचारांविषयी सांगितले.