scorecardresearch

Economic Recession : आर्थिक मंदीबाबत नारायण राणेंच्या विधानावरून काँग्रेसचा पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हटले की…

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारला आहे प्रश्न, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?

Economic Recession : आर्थिक मंदीबाबत नारायण राणेंच्या विधानावरून काँग्रेसचा पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हटले की…
(फोटो लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल(सोमवार) “जगातील अनेक मोठय़ा देशांमध्ये आर्थिक मंदी आहे. भारताला त्याची झळ बसू नये यासाठी भारत सरकारच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशात जूननंतर आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे.” असं सांगितलं. पुण्यात जी-२० परिषदेचे उद्घाटनानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली. त्यांच्या विधानावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसने यावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी आज(मंगळवार) नारायण राणेंच्या विधानवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्देशून देशापासून काय लपवत आहात? असा प्रश्न विचारला आहे.

जयराम रमेश काय म्हणाले? –

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, ‘‘२०१४ नंतर उध्वस्त झालेल्या सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग विभागाच्या केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सहा महिन्यानंतर भारतात मंदीची भविष्यवाणी केली आहे. त्यांनी जी 20 संमेलनात पुण्यात हे म्हटलं आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्री देशापासून काय लपवत आहेत?’’

नारायण राणेंनी काय सांगितले? –

‘‘सरकार बदलले की दृष्टिकोन बदलतो, निर्णय नाही. राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत, हे वास्तव नाही. राजकारण आहे. उद्योग बाहेर जात असल्यासंदर्भात दिशाभूल केली जात आहे. प्रत्येक राज्याचे उद्योगांच्या बाबत स्वत:चे धोरण असते. त्यानुसार कार्यवाही केली जाते. जागा, जागेचे मूल्य, विविध प्रकारच्या करसवलती यावर कोणत्या राज्यात उद्योग जाणार, हे निश्चित होते. देशातील प्रमुख काही राज्यांना एकाचवेळी प्रस्ताव दिले जातात. जे राज्य जास्त सवलत देईल, त्या राज्यात गुंतवणूक केली जाते, वस्तुस्थिती आहे. देशाच्या इतर भागापेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात जास्त आहेत. उद्योग राज्यातून जातात पण पुन्हा परत येतात, हा इतिहास आहे. मात्र राज्यात सर्वाधिक उद्योग आणले पाहिजेत.’’ असे नारायण राणे यांनी सांगितले.
याशिवाय, राणे म्हणाले की आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा कंपन्यांकडून रोजगार कपात केली जात आहे. रोजगार निर्मिती आणि रोजगार कपात यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 22:47 IST

संबंधित बातम्या