उदयपूर : काँग्रेसचा जनतेशी संपर्क तुटला असल्याची कबुली माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्यानंतर, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी ‘भारत जोडो’चा नारा दिला. येत्या २ ऑक्टोबरपासून (गांधीजयंती) काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा काढण्याची घोषणा सोनिया गांधी यांनी ‘नवसंकल्प’ चिंतन शिबिराच्या समारोपाच्या भाषणात केली.

 ‘‘सामाजिक एकता आणि संविधानावर होत असलेल्या हल्ल्याला पदयात्रेतून काँग्रेस प्रत्युत्तर देईल. तसेच, जनतेच्या दैनंदिन प्रश्नांवर आवाज उठवण्यात येईल, असे सांगत सोनिया यांनी ‘‘भाजपने उभ्या केलेल्या आव्हानांवर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला. ‘भारत जोडो’ पदयात्रेमध्ये तरुण आणि माझ्यासारखे बुजुर्गही सहभागी होतील. पण, या ज्येष्ठांना पदयात्रेत विनासायास सामील होता येईल आणि त्यांची दमछाक होणार नाही, असा मार्ग शोधावा लागेल, अशी मिश्कील टिप्पणीही सोनिया यांनी केली़

  ‘‘पक्षाला मजबूत करण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करण्याशिवाय पर्याय नाही’’, असे राहुल गांधी यांनी सोनियांच्या आधी केलेल्या भाषणात स्पष्ट केले. जिल्हास्तरावरील जनसंपर्क मोहीमही १५ जूनपासून सुरू होणार असून आर्थिक, बेरोजगारी, महागाई आदी प्रमुख विषयासंदर्भातही काँग्रेसची भूमिका जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.

‘‘चिंतन शिबिरातील सर्व चर्चामध्ये पक्षांतर्गत बाबींबाबत तक्रार केली गेली. कोणाला कोणते पद मिळाले आहे, वगैरे पक्षांतर्गत मतभेदींची चर्चा होत राहिली. पण, या अंतर्गत बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याची ही वेळ नव्हे. आता काँग्रेसचे लक्ष पक्षाबाहेरील बाबींकडे म्हणजेच जनतेकडे गेले पाहिजे. केवळ काँग्रेस पक्षासाठी नव्हे, तर देशाच्या हितासाठी आपण लोकांकडे गेले पाहिजे. पक्षातील ज्येष्ठ नेते असो वा तरुण नेते असो वा कार्यकर्ते असो, आपण प्रत्येकाने जनतेशी चर्चा केली पाहिजे, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे’’, असे खडेबोल राहुल यांनी ४०० हून अधिक पदाधिकाऱ्यांना सुनावले. ‘‘घाम गाळल्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष असून हाच या पक्षाचा ‘डीएनए’ आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा लोकांशी जोडून घेऊ शकतो’’, असेही राहुल म्हणाले.

नव्या युगातील राजकारणामध्ये काँग्रेसवर मात करत भाजप यशस्वी झाल्याची कारणे देताना राहुल गांधी म्हणाले की, ‘‘जनतेशी संपर्क साधण्यात भाजप माहीर आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष समाजमाध्यमांपासून विविध माध्यमांचा वापर करतो. काँग्रेसलाही जनतेशी विविध मार्गानी संपर्क साधता आला पाहिजे. वैचारिक भूमिका न बदलता काँग्रेसने आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, त्यासाठी नव्या माध्यमांचा उपयोग करून तरुणांना आकर्षित केले पाहिज़े’’

बुजुर्गाना अप्रत्यक्ष चपराक काँग्रेसला तरुण बनवण्यासाठी मोठे संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, जुने-जाणते पक्षात नको असे मी म्हणत नाही़  पण, प्रदेश समिती, जिल्हा समिती वा ब्लॉक समितींमध्ये आणि विविध स्तरांवरील नेतृत्वातही बुजुर्गासह तरुणांचाही समावेश झाला पाहिजे. तरुणांना अधिकाधिक संधी देण्याचा वेळ आली असून, त्यावर तातडीने अंमल झाला पाहिजे. ‘’एक कुटुंब एक उमेदवार’’ हा नवा नियम करणे अत्यंत गरजेचे आहे. संघटना महासचिव वेणुगोपाल यांनी अपवाद केले आहेत हे खरे. पण, एकाच कुटुंबातील ५ वा ६ वा ७ सदस्यांनी संघटनांच्या पदांवर राहणे उचित नाही. कुटुंबातील सदस्यांना संघटनेमध्ये पदे हवी असतील तर त्यांनी पक्षात सक्रिय राहून लोकांसाठी काम केले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले. संघटनात्मक बदलासंदर्भात पुढील दोन-तीन दिवसांमध्ये कृतीगटाची तसेच, पक्षाध्यक्षांच्या सल्लागार गटाची स्थापना केली जाणार असल्याचे सोनिया गांधी यांनी भाषणात सांगितले.