एक श्रेणी-एक सेवानिवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करीत नसल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. सदर योजनेची त्वरेने अंमलबजावणी करण्यासाठी आपण सरकारवर दबाव आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लष्करातील माजी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, या योजनेसाठी यूपीए सरकारने तरतूद केली होती आणि निधीचे वाटपही केले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार योजनेची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरले आहे, असेही गांधी म्हणाले.
मोदी सरकारला एक वर्ष झाले तरीही या प्रश्नावर कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. माजी अधिकाऱ्यांनी सरकारचे दरवाजे ठोठावले, मात्र त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. लष्कर, नौदल आणि हवाई दल आपल्या देशाचे, सीमेचे रक्षण करतात त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असेही गांधी म्हणाले.