नवी दिल्ली : पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिल्याच्या विधानावरून काँग्रेसने केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सोमवारीही चालू ठेवला. ‘‘या मुद्द्यावरील जयशंकर यांचे मौन अत्यंत घातक आहे. जयशंकर यांची कृती म्हणजे गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यामुळे भारताची किती विमाने पडली हे सत्य देशाला कळले पाहिजे,’’ असा शाब्दिक हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारीही केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सलग दुसऱ्या दिवशी जयशंकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले. ‘पाकिस्तानला माहिती देण्यास जयशंकर यांना केंद्र सरकारमधील कोणी परवानगी दिली होती, जयशंकर यांच्यामुळे भारताने किती लढाऊ विमाने गमावली,’ असे प्रश्न राहुल गांधी विचारले होते. त्यावर जयशंकर यांनी स्वत: कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून राहुल गांधींच्या आरोपांचे खंडन करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू होण्यापूर्वी नव्हे तर भारताने लष्करी कारवाई केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाकिस्तानला दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली जात असल्याची माहिती दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचाही प्रतिहल्ला

भाजपने राहुल गांधींच्या आरोपांच्या हेतूंवर शंका घेताना केंद्र सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा इरादा असून या आरोपांची वेळही संशय निर्माण करणारी असल्याचा आरोप केला. राहुल गांधी संरक्षण दलांचा अपमान करत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. तर राहुल कोणाच्या (पाकिस्तान) बाजूने बोलतात हे माहीत आहे, असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला.