उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या समूहनिहाय राजकीय समीकरणाला काँग्रेसने महिलाशक्तीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पाच महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत ४० टक्के महिला उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मंगळवारी लखनऊमध्ये केली. काँग्रेसच्या याच घोषणेवरून तृणमुलने टीका केली आहे. काँग्रेस आमच्या पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं तृणमुलने म्हटलंय.

“ममता बॅनर्जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने या देशातील राजकारणात महिलांचा वाढता सहभाग निश्चित करण्यासाठी मार्ग दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ४० टक्के जागा राखीव ठेवणारा आमचा पहिला पक्ष आहे,” असं तृणमुल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटलंय.

“काँग्रेससारखा पक्ष त्यांच्या वाईट दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आमचं (टीएमसी) अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर काँग्रेस गांभीर्यपूर्वक याबद्दल घोषणा करत असेल तर त्यांनी केवळ उत्तर प्रदेशमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही ४० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्यात,” असं टीएमसीने म्हटलंय.

काँग्रेसने पहिल्यांदाच ४० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचे जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागा असून किमान १६२ जागांवर काँग्रेसच्या महिला उमेदवार समाजवादी पक्ष व भाजपच्या उमेदवारांना आव्हान देतील. २०१७ मध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाशी युती केली होती व ११४  जागा लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त सात जागा काँग्रेसला जिंकता आल्या. यावेळी मात्र महिलांना प्राधान्य देऊन काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.