Congress TVK Alliance Rift: तमिळनाडू विधानसभेत काँग्रेस आमदार थाराई कुथबर्ट विरोधी बाकावर दिसले, विशेष म्हणजे विरोधी आमदारांच्या पहिल्या रांगेत कुथबर्ट बसल्याचे दिसून आले. यानंतर सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यातील मतभेदाची चर्चा होऊ लागली आहे. विधानसभेत हे चित्र दिसण्यापूर्वी राज्याचे पर्यटनमंत्री एस. राजेश कुमार यांनी कन्याकुमारी येथील एका कार्यक्रमात सरकारला इशारा देणारे वक्तव्य केले. टीव्हीकेने २०२९ मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून समर्थन न दिल्यास काँग्रेस मंत्री राजीनामा देतील, असा इशारा मंत्री राजेश कुमार यांनी दिला.

काँग्रेस आणि टीव्हीके नेत्यांची वक्तव्य

कन्याकुमारी येथे शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात पर्यटनमंत्री राजेश कुमार यांनी राहुल गांधी २०२९ मध्ये पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे टीव्हीके पक्षातून पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. टीव्हीके पक्षाचे नेते आणि बांधकाम मंत्री आढाव अर्जुना यांनी याबाबत बोलताना देशातील सर्वोच्च संविधानिक पदावर तमिळनाडूमधील नेता असावा, असे वक्तव्य केले होते. काँग्रेस आणि टीव्हीकेकडून समोर आलेल्या वक्तव्यांनंतर भाजपाने काँग्रेसवर टीका केली.

भाजपाची टीका

पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरुन मतभेद असताना काँग्रेस टीव्हीकेबरोबर सत्तेत का आहे? असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सी. आर. केशवन यांनी उपस्थित केला आहे. टीव्हीके मंत्र्यांकडून विधानसभेच्या सभागृहात देखील पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रचार केला जातो. हे राहुल गांधी यांच्या अयशस्वी नेतृत्वाला नाकारण्यासारखे आहे, असे केशवन म्हणाले. टीव्हीके सरकार राहुल गांधींचा अपमान करत आहेत तरी देखील काँग्रेस त्या सरकारमध्ये का आहे? असा सवालही केशवन यांनी ‘एएनआय’शी बोलताना केला.

पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार

दरम्यान, काही खासगी माध्यमांनी केलेल्या एका सर्वेक्षणात २०२९ ला पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यानंतर जोसेफ विजय यांच्या नावाला नागरिकांना पसंती दिली. २०२६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीव्हीके या पक्षाला घवघवीत यश मिळाले. टीव्हीकेला काँग्रेसने समर्थन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर पक्षांच्या सहकार्याने जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.