आसाममध्ये बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबविण्यात काँग्रेसला यश आलेले नाही आणि बेकायदेशीरपण स्थलांतर केलेल्यांचा काँग्रेस पक्ष व्होट बँक म्हणून वापर करीत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केला.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे आसाममध्ये प्रचाराला येणार आहेत, बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरांना आम्ही थांबवू असे सोनिया गांधी यांनी जाहीर करावे, मात्र त्या असे जाहीर करणार नाहीत कारण बांगलादेशातील घुसखोरांचा काँग्रेस व्होट बँक म्हणून वापर करीत आहे, असे शहा म्हणाले.
आसाममध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले की घुसखोरीचा प्रश्न संपुष्टात येईल, आम्ही बांगलादेशची सीमा बंद करू, त्यामुळे कोणत्याही घुसखोराला येथे पाऊल ठेवणे शक्य होणार नाही, असे शहा म्हणाले. बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा केवळ आसामचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशाचा प्रश्न आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्य आणि फाळणीच्या वेळी काँग्रेसने आसामला कोठे नेऊन ठेवले होते, पं. जवाहरलाल नेहरू यांनी आसामला ‘ड’ वर्गवारीच्या राज्याचा दर्जा दिला असे शहा म्हणाले.