समाजात विद्वेष पसरविणाऱ्या शक्तींविरुद्ध कारवाई करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. समाजात विद्वेष पसरविणाऱ्या शक्तींचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आता काँग्रेसने पुढाकार घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्रित आणण्यात येणार आहे.

हे मनसुबे उधळून लावण्यासाठी काँग्रेस सर्व लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी पक्षांपर्यंत पोहोचणार आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी सांगितले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून या प्रकारांमुळे चिंता वाढत चालली आहे, असेही शर्मा म्हणाले.
आपली मते मांडण्यासाठी जनता झुंडशाहीचा मार्ग अवलंबिते हा अस्वस्थ करणारा प्रकार आहे, असे मत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले त्याबद्दल शर्मा म्हणाले की, जेटली यांनी अशा शक्तींविरुद्ध कोणती कारवाई करणार ते सांगितले नाही. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मोदी यांना आपली भूमिका मांडण्यास भाग पाडले, असेही ते म्हणाले.

दादरी प्रकरण आणि वाढत्या असहिष्णुतेच्या प्रकारामुळे लेखकांकडून पुरस्कार परत करण्याचा घेण्यात आलेला निर्णय याबाबत चिंता व्यक्त करून काँग्रेसने अन्य विरोधी पक्षांना एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही शर्मा म्हणाले.