Congress Leader Sangeeta Tiwari : काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी पक्षनेतृत्त्वावर आणि पुणे शहर अध्यक्षांवर टीका करत काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. पुण्यातील महिला काँग्रेस कार्यालय बंद केल्यावरून आणि त्याबाबत वारंवार तक्रार दाखल करूनही त्याची दखल न घेतल्याने संगीता तिवारी यांनी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. यावरून त्यांनी आता टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं नाव घेत पक्ष सोडणार असल्याचं जाहीरपणे पुन्हा एकदा सांगितलं.
मी पक्ष सोडला नाही, पण…
संगीत तिवारी म्हणाल्या, “काँग्रेस पक्ष सोडायला मला मजबूर केलं जातंय. पुणे शहर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे काम करत आहेत, त्यांच्या त्रासाला कंटाळून मी काँग्रेस सोडायचा निर्णय घेतला आहे. मी काँग्रेस पक्ष अजून सोडलेला नाही. पण मी सोडणार आहे.”
तक्रार करूनही दुर्लक्ष
त्या पुढे म्हणाल्या, “अरविंद शिंदे यांनी आमचं महिला कार्यालय बंद केलं, कुलूप लावलं. त्यावेळी नाना पटोले अध्यक्ष होते, त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. याप्रकरणी लक्ष घालतो असं ते म्हणाले, पण इतर निवडणुकीच्या व्यस्त झाल्यावर ते विसरले. राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, चेन्नीथालाल या सर्वांना मेल केले. निवडणुकीनंतर याप्रकरणी पाहता येईल, असं त्यांनी सांगितलं. पण काहीच झालं नाही. नाना पटोलेंनंतर हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष झाले. त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली, पण त्यांनी येऊन या कार्यालयाचं उद्घाटनच केलं.”
जिथे माझी गरज असेल तिथे मी जाणार
“तुम्हाला निदर्शनाला महिला पाहिजेत, आंदोलनाला महिला पाहिजे, प्रचाराला, निवडणुकीवेळी सर्व कामं करायला महिला पाहिजेत. मग महिला काँग्रेसचं कार्यालय नको? मग जिथे गरज आहे तिथे मी जाणार आहे. याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार आहे”, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.