टांझानियातील एरिकाना व एल्युडी या नऊ महिने वयाच्या दोन सयामी जुळ्यांना १२ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर येथील अपोलो रूग्णालयातील डॉक्टरांनी सोमवारी रात्री वेगळे केले. ते नितंबाच्या ठिकाणी एकमेकांना चिकटलेले होते.
वनग्राम येथील अपोलो स्पेशालिटी रूग्णालयात सोमवारी सकाळी त्यांना ऑपरेशनसाठी नेण्यात आले होते, त्यानंतर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना वेगळे करण्यात यश आले. हे जुळे एकमेकांना जोडलेले असल्याने त्यांचे गुदद्वार, मूत्रमार्ग, शिस्न हे सामायिक होते. या स्थितीला ‘पायगोपॅगस’ असे म्हटले जाते. यात मुले वाचण्याची शक्यता खरेतर केवळ २० टक्के असते.
डॉ. व्ही. श्रीपती यांनी सांगितले की, आम्ही या मुलांच्या मूत्राशयात नळ्या घालून मूत्र काढून घेतले व नंतर त्यांना शस्त्रक्रियेने वेगळे केले. ‘पायगोपॅगस’ प्रकारच्या जुळ्यांची संख्या जगात १७ टक्के आढळून आली आहे. त्यात त्यांच्या पाठीकडच्या बाजू चिकटलेल्या असतात. अशा जुळ्यांचे तीस संच विचारात घेतले तर त्यात २६ मुली व चार मुले असतात. एकूण वीस डॉक्टर या शस्त्रक्रियेत सहभागी झाले होते. मेंदूविकार तज्ज्ञांनी या जुळ्यांचे मणके कुठे जुळले आहेत हे पाहिले व त्यांचे चेता मार्ग सुरक्षित ठेवून त्यांचे मूत्राशय, गुदद्वार,शिस्न, गुदद्वार वेगळे करण्यात यश आले.
रात्री नऊ वाजता ही शस्त्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही बाळांना वेगवेगळ्या शस्त्रक्रियागृहात नेऊन त्यांचे काही अवयव पुन्हा व्यवस्थित बसवण्यात आले. ते काम मध्यरात्रीनंतरही चालू होते.
रूग्णालयाच्या माहितीनुसार या मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून मूत्रविसर्जनही व्यवस्थित होत आहे. ह्दयाचे ठोके, श्वासोच्छवास, शरीराचे तापमान, रक्तदाब सर्व सुऱळीत होते. मेंदूरोगतज्ञ, प्लास्टिक सर्जन, बालरोगशल्यचिकित्सक या वेळी उपस्थित होते.
डॉक्टर व पत्रकारांना ही शस्त्रक्रिया पडद्यावर थेट दाखवण्यात आली. या जुळ्यांना पाच महिन्यांपूर्वी रूग्णालयात दाखल केले होते, आता ते एक महिन्याने घरी जाऊ शकतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.