scorecardresearch

Video: झेड प्लस सुरक्षा आणि PMOचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा बनाव, सीमाभागाला भेट देणाऱ्या गुजराती महाठगाला अटक

जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका तोतया अधिकाऱ्याला अटक केली आहे.

kiran patel
फोटो- ट्विटर/ किरण पटेल

जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका तोतया अधिकाऱ्याला अटक केली आहे. संबंधित आरोपीने पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा बनाव रचत जम्मू काश्मीरमधील अनेक उच्च अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांना संशय आल्यानंतर तोतया अधिकारी किरण पटेलचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गुजरातमधील रहिवाशी असलेल्या किरण पटेल या कथित कॉनमनने स्वतः पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त संचालक असल्याची बतावणी केली होती. ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, किरण पटेल याने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काश्मीर खोऱ्याला भेट दिली. तेव्हापासून तो काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी फिरला. अगदी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळ असलेल्या उरीमधील कमान पोस्ट ते श्रीनगरच्या लाल चौकापर्यंत झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेसह फिरला.

श्रीनगरमधील निशात पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, किरण पटेल हा निशात पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि काश्मीर खोऱ्यातील इतर काही भागांमध्ये फिरत होता. तो सरकारी पाहुणा म्हणून पंचतारांकित आलिशान हॉटेलमध्ये राहिला. त्याला वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. यानंतर किरण पटेल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी किरण पटेल याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. गुजरात पोलिसांचं एक पथकही तपासात सामील झालं आहे. या संपूर्ण घटनेबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत मौन बाळगलं आहे. पण केंद्रीय तपास यंत्रणांना सुगावा लागण्यापूर्वी सीआयडीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 15:14 IST
ताज्या बातम्या