नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यामध्ये झालेल्या ‘अभूतपूर्व’ विलंबाकडे लक्ष वेधत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन केले. या बैठकीत मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबतच्या नवीन प्रस्तावांवर चर्चा व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, अत्यंत दूरगामी परिणाम घडवणारे घटनादुरुस्ती विधेयक घाईघाईने किंवा बळजबरीने मंजूर करून घेण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मोदींना लिहिलेल्या पत्रात खरगे यांनी म्हटले की, “१३ ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यापासून ६४ दिवस उलटून गेले आहेत, तरीही संसदेची दोन्ही सभागृहे अद्याप अधिकृतपणे स्थगित करण्यात आलेली नाहीत.”
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या खरगे यांनी ही परिस्थिती ‘अभूतपूर्व’ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (डिलिमिटेशन) कोणतीही घटनादुरुस्ती विधेयक आणण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याबाबत त्यांनी ११ एप्रिल रोजीच पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मात्र, अशी बैठक न घेता सरकारने १४ एप्रिलच्या रात्री विधेयकांची माहिती सार्वजनिक केली आणि १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, असे खरगे यांनी पत्रात म्हटले आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला १७ एप्रिल रोजी लोकसभेत आवश्यक असलेले दोनतृतीयांश बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर १६ जुलै आणि २७ ऑगस्ट रोजीही आपण सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली होती. आता चौथ्यांदा ही मागणी आहे. – मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
सर्व राजकीय पक्षांना चर्चेसाठी वेळ द्या
सरकारच्या नव्या प्रस्तावांना अंतिम स्वरूप देऊन ते संसदेत विचारार्थ मांडण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांना आपापसांत तसेच इतर पक्ष आणि संबंधित घटकांशी चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा, असे खरगे यांनी म्हटले आहे. व्यापक घटनात्मक परिणाम असलेले विधेयक पुन्हा एकदा संसदेत घाईने पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
