एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली : पॅन्गाँग सरोवर भागात चीनने कथितरीत्या पुलाची उभारणी सुरू केल्याचे वृत्त असून याबाबत भारताच्या परराष्ट्र खात्याने गुरुवारी सांगितले की, ज्या भागाबाबत ही चर्चा सुरू आहे, तो भाग काही दशके चीनच्या ताब्यात आहे, अशी आमची धारणा आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी सांगितले की, ज्या पुलाबाबत बोलले जात आहे, तो त्या भागात चीन करीत असलेले दुसरे बांधकाम आहे. हा भाग भारत ज्या प्रदेश सीमेबाबत दावा करतो, त्या प्रदेशालगतच आहे, पण भारताने दावा केलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागापासून तो पूर्वेस २० किलोमीटरवर आहे.  बागची पुढे म्हणाले की, आम्ही या कथित पुलाबाबत माध्यमांत आलेले वृत्त पाहिले आहे. मला माहीत नाही, पण तो वेगळा पूल असावा. कुणी सांगते की तो दुसरा पूल आहे किंवा तो सध्याच्या पुलाचा विस्तारही असू शकतो. ज्या भागात हे सुरू आहे तो काही दशके चीनव्याप्त असल्याचे आम्ही मानतो. आम्ही याबाबत लष्करी दृष्टीने टिप्पणी करू शकत नाही, पण यावर संरक्षण खाते योग्यरीत्या सांगू शकेल. या सर्व घडामोडींवर आमचे लक्ष आहे.

काही महिन्यांपासून उभारणी

संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल अधिक रुंद असा दुसरा पूल आहे. चीनने आधी उभारलेल्या पुलाजवळच हासुद्धा बांधला जात आहे. काही महिन्यांपासून हे काम सुरू आहे. पहिल्या पुलासाठी हे तात्पुरते बांधकाम असावे असे आधी वाटले होते, पण हा दुसरा पूल होत आहे आणि तो बांधणे सोईचे व्हावे म्हणून आधीचा उभारला असावा.