scorecardresearch

महिला सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताच्या प्रगतीमध्ये महिलांनी बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

महिला दिनानिमित्त विकासातील महिलांच्या योगदानाची प्रशंसा

पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताच्या प्रगतीमध्ये महिलांनी बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले, की आपले सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी अविरत काम करत राहील.

या संदर्भात मोदींनी ‘ट्वीट’ केले, की आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमच्या महिलाशक्तीच्या कामगिरीबद्दल सलाम! देशविकासात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. आमचे सरकार महिला सबलीकरण प्रक्रिया अविरत चालण्यासाठी काम करत राहील. यावेळी मोदींनी विविध क्षेत्रांत यशोशिखर गाठणाऱ्या महिलांची संकलित माहिती ‘ट्विटर’वर प्रसृत केली. या महिलांच्या कामगिरीविषयी त्यांनी यापूर्वी आपल्या ‘मन की बात’ संवादसत्रात माहिती दिली होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘नारी शक्ती’ने विविध क्षेत्रांत दिलेल्या गौरवशाली योगदानाचे स्मरण केले. त्यांनी ‘ट्वीट’ केले, की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील हे सरकार विविध प्रभावी योजना व उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. लष्करात सियाचीनमध्ये तैनात होण्यापासून ते युद्धनौकांवर सेवेपर्यंत भारतीय महिला सशस्त्र दलांतील प्रत्येक आव्हानांवर सक्षमतेने मात करत आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना स्वावलंबी भारताच्या विकासगाथेत महिला शक्तीच्या योगदानाची प्रशंसा केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 04:16 IST