scorecardresearch

देशाला पुढे नेण्यात प्रत्येक पंतप्रधानांचे योगदान; नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : तीन मूर्ती भवनातील ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन

देशाचे बहुतांश पंतप्रधान शेतकरी, ग्रामीण, गरीब कुटुंबातून आले होते. लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य घरातील व्यक्तीदेखील देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते हा विश्वास त्यांनी तरुण पिढीला दिला, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरते.

नवी दिल्ली : देशाचे बहुतांश पंतप्रधान शेतकरी, ग्रामीण, गरीब कुटुंबातून आले होते. लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य घरातील व्यक्तीदेखील देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते हा विश्वास त्यांनी तरुण पिढीला दिला, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरते. प्रत्येक पंतप्रधानाने आपापल्या कार्यकाळात अनेक आव्हानांना सामोरे जात देशाला पुढे नेले, काही अपवाद वगळले तर देशाने लोकशाही परंपरा दृढ केली, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘पंतप्रधान संग्रहालया’च्या उद्घाटनप्रसंगी काढले

स्वातंत्र्यलढा, संविधानाची निर्मितीप्रक्रिया आणि देशाच्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानातून भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासाचे महत्त्व सांगणाऱ्या ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन गुरुवारी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांचे भव्य संग्रहालय असलेल्या दिल्लीतील तीन मूर्ती भवनाच्या आवारात मोदींच्या ‘मार्गदर्शना’खाली नवे पंतप्रधान संग्रहालय उभे राहिले असून ते पाहण्यासाठी मोदींनी पहिले तिकीट काढले!

४३ दालने..

या संग्रहालयाच्या उभारणीसाठी २७१ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. ही इमारत १० हजार ४९१ चौरस मीटर विस्तीर्ण असून त्यामध्ये विविध स्वरूपाची ४३ दालने आहेत. ही इमारत बांधताना तीन मूर्ती भवनाच्या आवारातील एकही झाड तोडले जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. ऊर्जा संवर्धनासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. असंख्य भारतीयांनी पेललेले ‘अशोक चक्र’ हे ‘पंतप्रधान संग्रहालया’च्या इमारतीचे बोधचिन्ह आहे.

योगदानाचा निष्पक्ष आदर!

माजी पंतप्रधानांची साहित्यसंपदा, त्यांचा पत्रव्यवहार, वैयक्तिक संग्राह्य वस्तू, त्यांना मिळालेले मानसन्मान-पदके, त्यांची भाषणे, त्यांचा वैचारिक दृष्टिकोन उलगडून दाखवणाऱ्या दृकश्राव्यफिती या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. प्रसार भारती, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन, संसद टीव्ही, संरक्षण मंत्रालय, देशी-विदेशी प्रसारमाध्यमे आदींकडे असलेल्या साहित्य-सामुग्रीतूनही माजी पंतप्रधानांच्या जीवनप्रवास मांडलेला आहे. सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा निष्पक्षपणे आदर करणे हा संग्रहालयाचा हेतू असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

नेहरू संग्रहालयाचेही आधुनिकीकरण करण्यात आले असून आता पं. नेहरूंच्या स्वातंत्र्यलढय़ातील तसेच, स्वातंत्र्योत्तर योगदानाची महती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मांडली गेली आहे. नेहरूंना जगभरातून मिळालेल्या, पण संग्रहालयात आत्तापर्यंत न मांडलेल्या भेटवस्तूही पाहण्याची संधी मिळेल. देशवासीयांना ११० रुपयांमध्ये अतुलनीय संग्रहालय पाहता येईल, ऑनलाइन तिकीट १०० रुपयांना उपलब्ध असेल.

मोदी म्हणाले

काही अपवाद वगळता लोकशाही मजबुतीकरणाची भारताची अभिमानास्पद परंपरा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत आज ज्या उंचीवर आहे त्यात स्वातंत्र्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारचे योगदान आहे. एक-दोन अपवाद वगळता लोकशाही बळकट करण्याची अभिमानास्पद परंपरा देशाला आहे, असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान संग्रहालयाचे श्रेय मोदी यांनी आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांना दिले. ते म्हणाले, प्रत्येक पंतप्रधानाने घटनात्मक लोकशाहीच्या ध्येयपूर्तीसाठी मोठे योगदान दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Contribution prime minister country forward narendra modi statement inauguration prime minister museum tin murti bhavan ysh

ताज्या बातम्या