हिंदू धर्मातील प्रथा आणि परंपरांची चेष्टा करत भारतीय डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका वादग्रस्त इस्रायली-अमेरिकन ज्यू धर्मगुरूवर जगभरातून टीकेची झोड उठली आहे. रब्बी योसी मिझराची असे या धर्मगुरूचे नाव असून, त्याच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी भारत आणि इस्रायलसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेत राहणारे ज्यू धर्मगुरू योसी मिझराची यांनी एका कार्यक्रमादरम्यान हिंदू धर्मीयांच्या गोपूजनावर आणि धार्मिक भावनांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. “तुम्हाला माहीत आहे ना, भारतामध्ये लोक घरामध्ये गाईंची पूजा करतात आणि जमिनीवर पडलेले गाईचे मूत्र चाटतात” असा दावा त्यांनी केला. तसेच भारतीय डॉक्टरांनाही यात ओढत, “उद्या तुम्ही दिल्लीतील एखाद्या रुग्णालयात गेलात आणि तेथील डॉक्टर आदल्या रात्री हेच करून आले असतील तर?” असे विधान केले. यासोबतच “दिल्लीतील रस्त्यांवर गाईंमुळे वाहतूक कोंडी होते,” अशी उपरोधिक टिप्पणी करत त्यांनी “बरं झालं, देवानं आम्हाला यांच्यासारखं बनवलं नाही,” असे म्हणत हसत देवाचे आभार मानले.

इस्रायली संशोधकाचा तीव्र संताप

मिझराची यांच्या या वक्तव्यानंतर इस्रायली आणि भारतीय नागरिकांनी सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. सध्या भारतात राहणारे इस्रायली संशोधक आणि लेखक यशाया रोझेनमन यांनी मिझराची यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

रोझेनमन यांनी म्हटले की, “मिझराची यांच्या अशा नासक्या विचारसरणीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलच्या प्रतिमेचे भरून न निघणारे नुकसान होत आहे. ब्रिटनने ज्याप्रमाणे मिझराची यांच्या प्रवेशावर बंदी घातली होती, तशीच बंदी आता इस्रायलनेही त्यांच्यावर घालावी.”

पॅलेस्टाईनच्या राजदूतांची प्रतिक्रिया

या वादावर भारतामध्ये नियुक्त असलेल्या पॅलेस्टाईनच्या राजदूतांनीही भाष्य केले आहे. “जे लोक दुसऱ्यांच्या धर्माची, श्रद्धेची आणि परंपरांची टवाळी करतात, ते संपूर्ण मानवतेला आणि सहअस्तित्वाला धोका निर्माण करतात. वंशद्वेष ही मानवतेसमोरील सर्वात मोठी आपत्ती आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कोण आहेत वादग्रस्त रब्बी योसी मिझराची?

मिझराची हे ‘डिव्हाईन इन्फॉर्मेशन’ नावाची एक ऑनलाईन धार्मिक संस्था चालवतात. याआधीही त्यांनी अनेक धार्मिक समुदाय, अपंग व्यक्ती आणि कर्करोगग्रस्तांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. २०१५ मध्ये त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील ‘होलोकास्ट’मधील (ज्यूंचे हत्याकांड) मृतांची संख्या चुकीची सांगून वाद निर्माण केला होता; नंतर त्यांना याबद्दल माफी मागावी लागली होती. ‘ऑटिझम’ किंवा ‘डाऊन सिंड्रोम’ यांसारख्या आजारांसह जन्मलेली मुले ही त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापांची फळे असतात, असा अजब दावाही त्यांनी केला होता. २०१९ मध्ये त्यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान तिथल्या गृहविभागाने त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे अटकेच्या किंवा चौकशीच्या भीतीपोटी त्यांनी स्वतःच ब्रिटनचा दौरा रद्द केला होता.

मिझराची यांच्या हिंदू धर्मावरील ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या विकृत मानसिकतेवर जगभरातून टीका होत असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.