भाजप खासदाराची वादग्रस्त विधाने

नवी दिल्ली: मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या जंगी किसान महापंचायतीनंतर, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात भाजपचे नेते आक्रमक होत वादग्रस्त विधाने करू लागले आहेत. उत्तर प्रदेशमधील बहराईचचे भाजप खासदार अक्षयवर लाल गोंड यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांना ‘दरोडेखोर’ म्हटले असून परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

गोंड यांच्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन ‘काँग्रेस पुरस्कृत’ असून परदेशी एजंटांकडून आंदोलनाला आर्थिक मदत दिली जाते, असा आरोप करत बोम्मई यांनी गोंड यांच्या मताला पाठिंबा दिला आहे. बहराईचचे खासदार गोंड यांनी शेतकरी संघटनांवर शाब्दिक हल्लाबोल करताना आंदोलकांना पाकिस्तान, खलिस्तानवादी ठरवले. कॅनडा आणि इतर देशांतून मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी पैसा पुरवला जात असल्याचाही दावा गोंड यांनी केला. आंदोलनात शेतकरी नसून राजकीय पक्षाचे लोक सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन केले असते तर, फळ-भाज्या, दूध, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असता, असे गोंड म्हणाले.

सोमवारी ‘भारत बंद’

केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी, २७ सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मोर्चातील शेतकरी संघटना तसेच कामगार संघटना पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये ‘बंद’मध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील ‘बंद’च्या आयोजनासंदर्भात सोमवारी मुंबईत सुमारे १०० संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीनंतर अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड आदींची भेट घेतली. भारत बंदला पाठिंबा देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिल्याचा दावा ढवळे यांनी केला.