नवी दिल्ली : काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ‘मतदार यादी’ म्हणजेच सदस्य नोंदणीची नवी यादी ऑनलाइन जाहीर करण्यावरून पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत. ‘ज्यांना ही यादी पाहायची असेल, त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन प्रत्यक्ष बघावी. ही यादी जाहीर करण्याची गरजच काय,’ असा सवाल काँग्रेसचे नेते प्रताप बाजवा यांनी केला आहे.

काँग्रेसचे संघटना महासचिव के. वेणुगोपाल आणि पक्षाच्या निवडणूक विभागाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री या दोघांनीही ‘मतदार यादी’ जाहीर केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने सदस्य नोंदणी मोहीम राबवली होती, त्यातून नवे सदस्य पक्षाशी जोडले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र नवी यादी जाहीर केल्याशिवाय या दाव्यावर विश्वास कसा ठेवणार? पक्षाध्यक्षपदाची निवडणूक निर्दोष व्हावी असे वाटत असेल तर, काँग्रेसने ही यादी जाहीर केली पाहिजे, अशी मागणी बंडखोर गटातील नेते मनीष तिवारी, शशी थरूर, कार्ती चिदम्बरम, आनंद शर्मा आदींनी केली आहे.

man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल
narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच

पक्षाध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून राहुल गांधी पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार नसतील, तर गांधी निष्ठावान उमेदवाराला बंडखोर गटाकडून आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून वादंग माजला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सुमारे ९०० पात्र सदस्य मतदान करू शकतील. काँग्रेसचे नेते प्रताप बाजवा यांच्या म्हणण्यानुसार, ही पक्षांतर्गत निवडणूक असून त्यासाठी यादी जगजाहीर करण्याची आवश्यकता नसते. ज्या व्यक्ती तशी मागणी करत आहेत, त्यांच्यापैकी कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत. तरीही त्यांच्याकडून विनाकारण मागणी केली जात आहे. ज्या फांदीवर बसलो, त्यावर कुऱ्हाड चालवण्याचा हा प्रकार असल्याची टीकाही बाजवा यांनी केली.

दिल्ली, जम्मूतील सभांकडे लक्ष

दिल्लीत रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसची जंगी सभा होणार असून त्यामध्ये राहुल गांधी कार्यकर्त्यांसमोर भाषण करणार आहेत. ही सभा महागाईविरोधात निदर्शने करम्ण्यासाठी आयोजित केली असली तरी, पक्षांतर्गत घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कारण, त्याच दिवशी आझाद जम्मूमध्ये जाहीर सभा घेणार असून कदाचित नव्या पक्षाची घोषणाही केली जाऊ शकेल, असे मानले जात आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची ही पहिलीच जाहीर सभा असेल.

पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाईची मागणी

काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचा दावा करत त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती काँग्रेसच्या विदेश विभागाचे सचिव विरेंद्र वशिष्ट यांनी केली आहे. ही विनंती करणारे पत्र पक्षाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख तारिक अन्वर यांच्याकडे पाठवले आहे. बंडखोर ‘जी-२३’ गटातील सदस्य असलेल्या भूपेंदर हुडा व आनंद शर्मा यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आझाद यांची भेट घेतली होती.