गौतम बुद्धांच्या जन्मस्थळावरून वाद; परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानावरून नेपाळ भडकला

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा दिला हवाला

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

भारत-नेपाळ यांच्यात संबंध सीमावादानंतर आता जन्मस्थळांवरून वाद सुरू झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतात झाल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर नेपाळ भडकला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त करत गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे नेपाळनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा हवाला दिला आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना महात्मा गांधी व भगवान गौतम बुद्ध यांना भारतीय असल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळनं आक्षेप घेतला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी आपलं म्हणणं मांडलं आहे. “ऐतिहासिक आणि पुरातत्व पुराव्यांच्या आधारावर हे सिद्ध झालेलं आहे की, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. बुद्धांचं जन्मस्थळ युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीतील स्थळांपैकी एक आहे,” असं नेपाळनं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा हवालाही नेपाळनं दिला आहे. “नेपाळच्या संसदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘नेपाळ एक असे राष्ट्र आहे, जिथे विश्वशांतीचं प्रतीक असलेल्या बुद्धांचा जन्म झाला आहे. बौद्ध धर्म काळानुसार नेपाळमधून जगभरात पोहोचला,” असं नेपाळनं म्हटलं आहे.

एस. जयशंकर नेमकं काय म्हणाले होते?

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ‘सीआयआय’च्या शिखर संमेलनात बोलताना म्हणाले होते की, “महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध असे भारतीय महापुरूष आहेत, ज्यांचं जग नेहमीच स्मरण करत असते. आतापर्यंतचे सर्वात महान भारतीय कोण असेल, तर मी म्हणेल गौतम बुद्ध आणि दुसरे महात्मा गांधी,” असं जयशंकर म्हणाले होते. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळनं आक्षेप घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Controversy on birthplace of gautam buddha nepal country foreign minister statement bmh

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या