उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये लोणी बॉर्डर पोलीस स्टेशनची गोमांस तस्करांशी झालेली चकमक आता प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. या चकमकीत सात जणांना गुडघ्यापासून काही इंच खाली गोळ्या घातल्या गेल्या. या चकमकीमुळे सर्वांना एकाच ठिकाणी गोळ्या लागल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या सातही जणांना पोलिसांनी गोहत्येच्या आरोपाखाली पकडले आहे. त्याचवेळी गोदामातून दोन दुचाकी, तीन जनावरांचे मृतदेह, सात पिस्तुले, काडतुसे जप्त करण्यात आले.

११ नोव्हेंबरला सकाळी ६.१० वाजला बेहता हाजीपूर येथील रद्दीच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला. गोदामात बंदी असलेल्या जनावरांची कत्तल केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये चकमकीनंतर सात तस्करांना अटक करण्यात आली. ही चकमक आता चर्चेचा विषय बनली आहे.

जखमी आरोपींच्या फोटोत ते हॉस्पिटलमधील दगडी बाकावर फिल्मी स्टाईलमध्ये एकत्र बसलेले आहेत. सगळ्यांना जवळपास एकाच ठिकाणी एकाच पायात गोळ्या घालण्यात आल्या आहेत. फोटोमध्ये त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत आहेत.

छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण त्यांचे लक्ष्य चुकले. त्यातील एक गोळी पोलिसांच्या गाडीला लागली. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युतरादाखल गोळीबार केला. मात्र आता तस्करांच्या एन्काउंटरबाबत गाझियाबाद पोलिसांना प्रश्नांनी घेरले गेले आहे. या चकमकीत एका अल्पवयीन मुलाला देखील गोळी लागल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाच्या वयाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी, चकमकीनंतर, पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गोहत्येच्या माहितीवरून पोलिसांचे पथक गोदामावर छापा टाकण्यासाठी गेले असता, आरोपींनी गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. गोळ्या झाडण्यात आल्या, त्यामुळे सर्व आरोपींच्या पायाला दुखापत झाली.

आरोपींकडून तीन जनावरांचे मृतदेह, सात देशी बनावटीचे पिस्तूल, दोन कुऱ्हाड, पाच चाकू आणि प्लास्टिक वायरचे दोन बंडल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या शोएबचे वडील इस्लाम यांनी या सात जणांच्या पायात गोळ्या लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केली आहे. या मुलांना त्यांच्या धर्मामुळे फसवले जात आहे. मुस्लिमांना अशा आरोपांमध्ये अडकवणे सोपे आहे, असे इस्लाम यांनी सांगितले.

“या मुलांना बळीचे बकरे बनवले जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांचा नेम इतके अचूक असेल तर ते पोलिसात का काम करत होते? त्यांनी खेळात भारताचे प्रतिनिधित्व करायला हवे होते,” असे इस्लाम म्हणाले.

सध्या या प्रकरणी इन्स्पेक्टर राजेंद्र त्यागी यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंदिरापुरम पोलीस ठाण्यात बदली केली आहे. बदलीमुळे दुखावले गेलेले त्यागी काही दिवस रजेवर असल्याचं बोललं जातंय.