नवी दिल्ली : काँग्रेसमधील नाराज नेते मनीष तिवारी यांनी मुंबई दहशतवादी हल्लय़ाच्या घटनेवरून स्वपक्षालाच मंगळवारी कचाटय़ात अडवले. ‘२६/११’ च्या हल्लय़ानंतर पाकिस्तानविरोधात कारवाई न करता संयम बाळगणे हा ताकदीचा आविष्कार नव्हता तर दुबळेपणा होता, असा थेट शाब्दिक हल्लाबोल तिवारी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

‘२६/११’मध्ये मुंबईमध्ये झालेल्या हल्लय़ानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर न देऊन यूपीए सरकारने देशाच्या सुरक्षेला धोक्यात आणले, असा आरोपही तिवारी यांनी ‘१० फ्लॅश पॉइंट, २० इयर्स : नॅशनल सिक्युरिटी सिच्युएशन्स दॅट अम्पॅक्टेड इंडिया’ या पुस्तकातून केला आहे. या वादग्रस्त टिप्पणीमुळे राजकीय वाद उफाळून आला असून भाजपनेही मंगळवारी काँग्रेसला घेरले. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार किती कुचकामी होते याचा पुरावाच तिवारी यांनी सादर केल्याची टीका प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली.

एखाद्या देशाला (पाकिस्तान) निर्दोष लोकांचे हत्याकांड घडवून आणण्यात कसलाही पश्चात्ताप होत नसेल तर त्याविरोधात संयम दाखवणे हे सशक्ततेचे द्योतक नव्हे, उलट हा कमकुवतपणाच ठरतो. ‘२६/११’ दहशतवादी हल्ला ही नामी संधी होती, जिथे शब्दांपेक्षा प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याची गरज होती, असे मनीष तिवारी यांनी पुस्तकात नमूद केले आहे. ‘२६/११’च्या हल्लय़ाची तुलना तिवारी यांनी अमेरिकेतील ‘९/११’च्या दहशतवादी हल्लय़ाशी केली असून अमेरिकेने ज्याप्रमाणे तातडीने लष्करी कारवाई केली, त्याप्रमाणे भारतानेही तत्पर (लष्करी) प्रत्युत्तर द्यायला हवे होते, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

‘यूपीए’च्या निष्क्रियतेचा दाखला- गौरव भाटिया

तिवारी यांच्या पुस्तकामुळे यूपीए सरकार किती निष्क्रिय होते हे समोर आले आहे. तत्कालीन मनमोहन सरकारला देशाच्या सुरक्षेची कोणतीही चिंता नव्हती. मुंबई हल्लय़ामध्ये शहीद झालेले पोलीस आणि जवानांची प्राणांची आहुती व्यर्थ ठरली. हल्लय़ानंतर लगेचच पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता, पण काँग्रेस मात्र हिंदू दहशतवादाचा गैरप्रचार करत होती. आपल्या लष्कराला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याची परवानगी का दिली नाही, याचे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली.

तिवारींवर कारवाई?..

मनीष तिवारी यांच्या पुस्तकामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून मंगळवारी सकाळी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष ए. के. अ‍ॅण्टनी यांनी ‘दहा जनपथ’वर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. याआधी सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकानेही काँग्रेसला अडचणीत आणले होते, पण तिवारी यांनी पुस्तकातील टिप्पणीद्वारे अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्ष्य बनवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तिवारी यांच्याविरोधात पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते.