बंगळुरू : बंगळुरू : कर्नाटकमध्ये ‘पेसीएम’ भित्तीपत्रकावरून वाद निर्माण झालाय. शहराच्या मुख्य भागात बुधवारी सकाळी ही भित्तीपत्रके झळकली. पेटीएम कंपनीच्या मांडणीशी साधर्म्य असलेल्या या पोस्टरच्या ‘क्यू आर कोड’मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा चेहरा आहे. मुख्यमंत्र्यांची अशाप्रकारे खोड काढल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. ही भित्तीपत्रके झळकल्यानंतर काही वेळातच प्रशासनाने हटवली असली तरी दिवसभर त्याचीच चर्चा सुरू होती. या प्रकाराबाबत मुख्यमंत्री बोम्मई यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘‘मला आणि कर्नाटकला बदनाम करण्यासाठी हा पद्धतशीर कट आखण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश मी दिले आहेत. यामागे कोण आहे, याचा आम्ही छडा लावू,’’ असे ते म्हणाले. या प्रकारामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला.

काय होते यात? मुख्यमंत्र्यांच्या रेखाचित्रासह ‘४० टक्के स्वीकारले जातील, क्यू आर स्कॅन करून मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराची किंमत चुकवायला लावा’ अशी वाक्ये या भित्तीपत्रकांवर होती.

४० टक्क्यांचे प्रकरण..

कोणतेही काम मिळवण्यासाठी ४० टक्के द्यावे लागतात, असा आरोप काही कंत्राटदारांच्या एका संघटनेने केला होता. त्यानंतर काँग्रेसने सरासरी कामे आणि नोकऱ्यांमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात व्यापक अभियान छेडले आहे.

कुणी केले हे? भित्तीपत्रकावरील ‘क्यू आर कोड’ स्कॅन केल्यानंतर ‘४० टक्के सरकारा’ हे संकेतस्थळ उघडले जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने हे संकतस्थळ तयार केल्याची माहिती आहे.

माझ्यापेक्षा कर्नाटकच्या बदनामीमुळे मी दु:खी झालो आहे. अशा प्रचारामुळे कर्नाटकचे नाव खराब केले जात आहे. त्यामुळे आम्ही हे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.  – बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री, कर्नाटक