‘देवापेक्षा आपल्याला जास्त समजते, असे मोदी यांना वाटते’, राहुल हे ‘बनावट गांधी’ – भाजपचा पलटवार

नवी दिल्ली

भारतात काही लोक आहेत, ज्यांना देवापेक्षा आपल्याला जास्त समजते असे वाटते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा नमुन्यांपैकी (स्पेसिमेन) एक आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. अमेरिकेतील एका कार्यक्रमातील या विधानावर भाजपने तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष हे ‘बनावट गांधी’ आहेत. त्यांना काहीही माहिती नसताना ते प्रत्येक विषयातील तज्ज्ञ आहेत, असे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

इंडियन ओव्हरसीज काँग्रेस यूएसए या संघटनेने कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे आयोजित केलेल्या ‘मोहब्बत की दुकान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘‘तुम्ही मोदीजींना देवासोबत बसवले तर ते देवालाही समजावून सांगतील की, हे विश्व कसे चालते आणि देवही त्याने काय निर्माण केले याबद्दल गोंधळून जाईल. त्यांना वाटते की ते इतिहासकारांना इतिहास, शास्त्रज्ञांना विज्ञान आणि सैन्याला युद्धशास्त्र समजावून सांगू शकतात. असा विचार करण्यामागे त्यांची अतिसामान्य बुद्धिमत्ता कारणीभूत आहे. पण, ते ऐकायला तयार नाहीत,’’ अशी खरमरीत शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीकेची तोफ डागली. यावर संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला आहे. ‘‘राहुल गांधी विदेशात जाऊन दरवेळी भारताचा अपमान करतात. जगभर मोदींकडे आदराने बघितले जाते, हे काँग्रेसला बघवत नाही,’’ अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. विदेश दौऱ्यांमध्ये मोदींनी २४ पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली, त्यांच्याशी ५० हून अधिक बैठका घेतल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना ‘बॉस’ म्हणाले. इटलीच्या पंतप्रधानांनी मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे गौरवोद्गार काढले, याची आठवणही ठाकूर यांनी करून दिली.

भाजपच्या काही कृत्यांमुळे भारतात मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. त्यावर राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी केला. मोदींनी धर्माधारित मतांचे राजकारण संपुष्टात आणले, ही बाब काँग्रेसला अजूनही खटकत आहे. भारतील मुस्लीम इथल्या विकासाचा भाग आहेत, असे मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले.

कार्यक्रमात खलिस्तानवाद्यांचा गोंधळ

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात काही खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करून गोंधळ घातला. १९८४च्या शिखविरोधी दंगली, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘नफरत के बाजार में, मोहब्बत की दुकान’ असे सांगत गांधी यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना हसून उत्तर दिले. मात्र या घटनेवरून भाजपने राहुल गांधींवर टीकेची संधी साधली. भाजप नेते अमित मालवीय यांनी याची दृश्यफीत ट्विटरवर प्रसृत करत ‘ऐसी नफरत की आग लगाई थी, जो अब तक नही बुझी,’ असे लिहिले.

जग खूप मोठे आहे आणि कुणालाही समजण्यासाठी गुंतागुंतीचे आहे. पण एक आजार आहे, भारतातील लोकांच्या एका गटाची खात्री आहे की त्यांना जगातील प्रत्येक गोष्ट ठावूक आहे. त्यांना वाटते की त्यांना देवापेक्षाही जास्त समजते. मोदी हे अशा ‘नमुन्यां’पैकी एक आहेत.- राहुल गांधी, काँग्रेस नेते
ज्यांना कसलीच माहिती नाही, ते अचानक सर्व विषयांचे तज्ज्ञ झाले ही गमतीची बाब आहे. अशी व्यक्ती, ज्याचे इतिहासाचे ज्ञान त्याच्या कुटुंबापलीकडे नाही, तो इतिहासाबाबत बोलत आहे. बटाटय़ांपासून सोने तयार करण्याचा दावा करणारी व्यक्ती विज्ञानाबद्दल बोलत आहे. – प्रल्हाद जोशी, संसदीय कार्यमंत्री

Story img Loader