बॉलीवूडची डीम गर्ल आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते बनवण्याचे वक्तव्य राजकारणात अनेकदा ऐकायला मिळाले आहे. लालू प्रसाद यादवांपासून अनेक नेत्यांनी असे वक्तव्य केले होते. मात्र आता राजेंद्र गुडा यांनी राजस्थानच्या गेहलोत सरकारमध्ये मंत्री होताच वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी एका अभियंत्याला सांगितले की, “आता हेमा मालिनी म्हातारी झाली आहे, त्यामुळे माझ्या गावात कतरिना कैफच्या गालासारखे चमचमीत रस्ते बनवा.”

राजस्थानच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी असलेले राजेंद्र गुढा यांनी हे वादग्रस्त विधान केले. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या विधानसभा मतदारसंघात पोहोचले होते. येथे लोकांनी खराब रस्त्यांच्या बांधकामाबाबत मंत्र्यांकडे तक्रार केली होती. यानंतर  राजेंद्र गुढा यांनी पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता एनके जोशी यांना फोन करून सांगितले की, माझ्या गावात कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बनवा. कारण हेमा मालिनी आता म्हाताऱ्या झाल्या आहेत.

हेमा मालिनी यांच्याबाबत राजस्थानचे मंत्री राजेंद्र गुडा यांचे हे विधान नवीन नाही. याआधीही चित्रपट अभिनेत्रींबाबत राजकारण्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. मध्य प्रदेशपासून ते महाराष्ट्र आणि बिहारपर्यंतही हेमा मालिनी यांच्यावर निशाणा साधला आहे. या यादीत बिहारचे माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांचा क्रमांक लागतो. २००५ मध्ये लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत सांगितले होते की, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे चमचमीत होतील.

ऑक्टोबर २०१९ मध्ये मध्य प्रदेशचे तत्कालीन मंत्री पीसी शर्मा यांनीही वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी खराब रस्त्यांचे वर्णन भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासारखे केले आणि त्यानंतर हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते बनवण्याच्या सूचना दिल्या.