दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करण्यात आली. मात्र, कार्यक्रमासाठी सदनाच्या दर्शनी भागात ठेवलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला होता. हे बेजबाबदार कृत्य राज्य सरकारला शोभत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. हा कार्यक्रम संपल्यावर दोन्ही पुतळे मूळ जागी पूर्ववत ठेवण्यात आले. सदनाच्या दर्शनी भागात पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मोठा जिना असून त्याच्या शेजारी हे पुतळे पूर्वीपासून ठेवण्यात आले आहेत. सावरकरांची जयंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरी होणार असल्यामुळे जिन्याचे दोन्ही कठडे व भिंत फुलांनी सजवली होती. भिंतीसमोर सावरकरांची मूर्ती ठेवण्यात आली होती. सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळय़ाच्या जागी मोठय़ा समया ठेवलेल्या होत्या. शिवाय, मान्यवरांची आसनव्यवस्थाही होती. कोणालाही अडचण होऊ नये म्हणून दोन्ही पुतळे हटवण्यात आले होते, असे सांगण्यात आले. सावरकरांना आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या लोकांनी पुतळय़ाशेजारी पादत्राणे काढली तर तेही योग्य झाले नसते. त्यामुळे पुतळे थोडे दूर ठेवण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यावर ते पुन्हा मूळ जागी ठेवले गेले, असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. सावरकरांसाठी सावित्रीबाई व अहिल्यादेवींचा पुतळा हटवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आदींनी टीका केली. महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भानदेखील सरकारला राहिले नाही, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले. सावरकरांना अभिवादन फग्र्युसन महाविद्यालयातील खोलीच्या दर्शनासाठी गर्दी पुणे : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या फग्र्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली सावरकर जयंतीनिमित्त रविवारी दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. सावरकरप्रेमींनी मोठय़ा संख्येने या खोलीचे दर्शन घेऊन सावरकरांना अभिवादन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते रविवारी सकाळी सावरकरांच्या अर्धपुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी खासदार प्रदीप रावत, महेश आठवले, प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. सविता केळकर, मिलिंद कांबळे, शाहीर हेमंत माळवे आदी या वेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृह क्रमांक एकमधील खोली क्रमांक १७मध्ये राहत होते. त्यांच्या वापरातील विविध वस्तूंचे जतन या खोलीत करण्यात आले आहे.