संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अधिवेशन २४ सप्टेंबरला सुरू होत असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह शंभर देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

संयुक्त राष्ट्रात पुढील आठवड्यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. २०२० मध्ये कोविडमुळे हा कार्यक्रम आभासी पद्धतीने घेण्यात आला होता. मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेस २५ सप्टेंबर रोजी संबोधित करणार असून त्याच निमित्ताने क्वाड देशांच्या बैठकीस २४ सप्टेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत. मोदी, बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानी पंतप्रधान योशिहिडे सुगा हे नेते क्वाड शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत.

क्वाड देशांची पहिली आभासी बैठक १२ मार्च २०२१ रोजी झाली होती त्यात प्रादेशिक व इतर विषय चर्चेला होते. मोदी यांचे ७६ व्या आमसभा अधिवेशनात २५ सप्टेंबर रोजी भाषण होणार असून कोविडनंतरचे पुनरू त्थान या विषयावर चर्चा होणार आहे. एकूण १०९ देशांचे प्रमुख  चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यातील साठ देशांच्या नेत्यांची भाषणे ध्वनिचित्रमुद्रित असतील. बायडेन हे न्यूयॉर्कला येणार असून प्रथमच आमसभेत भाषण करणार आहेत. ब्राझीलच्या प्रमुखांनंतर बायडेन यांचे भाषण होणार आहे यावेळची चर्चा ही २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. अफगाणिस्तानच्या प्रतिनिधीला बोलण्याची संधी शेवटी मिळणार आहे. त्यांचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गुलाम इसाकझाई हे भाषण करतील अशी अपेक्षा आहे. त्यांची नेमणूक आधीचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी केली होती.