scorecardresearch

कंगाल पाकिस्तानचा जीवघेणा जुगाड; प्लास्टिकच्या पिशव्यांमधून विकला जातोय घरगुती गॅस

पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत जात असल्यामुळे जीवघेणे जुगाड केले जात आहेत.

कंगाल पाकिस्तानचा जीवघेणा जुगाड; प्लास्टिकच्या पिशव्यांमधून विकला जातोय घरगुती गॅस
पाकिस्तानमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गॅस भरून विकाला जातोय.

पाकिस्तानात आर्थिक संकट अधिक गहिरे होत असून लोकांना रोजच्या जगण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवघेणा जुगाड करावा लागत आहे. पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम आणि खैबर पख्तूनख्वा या भागात सध्या एलपीजी सिलिंडर विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे येथील लोक एक अजब जुगाड करत आहेत. येथे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गॅस भरून विकला जातोय. ज्यांच्याकडे गॅस पाईपलाइनचे कनेक्शन आहे त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात असा अवैध व्यवसाय केला जात आहे. पोलिसांनी अनेक लोकांना अटक केली तरी राजरोसपणे हा व्यवसाय सुरु आहे. आता तर सोशल मीडियावर देखील पाकिस्तानच्या या अजब जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

डीडब्लू डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार गॅस पाइपलाईन असलेले दुकानदार थोड्या जाड प्लास्टिक पिशव्यांमध्ये दोन ते चार किलोच्या आसपास एलपीजी गॅस भरून विकतात. या प्लास्टिक पिशव्यांच्या तोंडावर वॉल्व्ह लावण्याची सोयही त्यांनी केली. तीन ते चार किलोचा गॅस भरण्यासाठी एक तासाभराचा वेळ लागतो. जे गरिब लोक आहेत, ते असा जीवघेणा गॅस विकत घेतात. एका छोट्या इलेक्ट्रिक सक्शन पंपच्या मदतीने या पिशव्यांमधून गॅस ओढला जाऊन त्याचा वापर केला जातो. हे असे धोकादायक गॅस फुटण्याचेही अनेक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तरिही गरिबीमुळे अनेकांना नाईलाजाने हे जीवघेणे प्लास्टिक सिलिंडर घ्यावे लागत आहेत.

प्लास्टिकमध्ये गॅस विकण्याची वेळ का आली?

पाकिस्तानात नैसर्गिक गॅसची कमतरता भासत आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरला खूपच मागणी आहे. जेवणापासून ते इतर औद्योगिक कामांसाठीही एलपीजी वापरला जातोय. त्यामुळे एलपीजी सिलिंडर सामा्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. ११.८ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत २,५४८ झाली असून व्यावसायिक सिलिंडरची किंमत १० हजार रुपयांपर्यंत गेली आहे.

तुलनेत प्लास्टिक गॅस स्वस्त

एका बाजूला गॅस सिलिंडरची किंमत वाढत असताना प्लास्टिक गॅस मात्र ५०० ते ९०० रुपयांच्या आसपास मिळतो. तर पिशव्यांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या कम्प्रेसरची किंमत दीड हजार ते दोन हजाराच्या आसपास आहे. महागाईची झळ बसत असल्यामुळे सामान्यांनी जीवघेणा प्लास्टिक गॅस घेणे पसंत केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 20:10 IST

संबंधित बातम्या