काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाच चुकून गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली आहे. हा पोलीस कर्मचारी देशविरोधी घटक असल्याचा गैरसमज झाल्याने सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घातल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी जबरदस्ती मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होता. अजय धार असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हंडावारा येथे तो वास्तव्यास होता. पोलिसांनी ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अजय धार याने रात्री मंदिराचा दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली असता हवेत गोळीबार करण्यात आला होता. “हवेत गोळीबार करण्यात आल्यानंतरही अजय धार आपली ओळख न सांगता दरवाजा वाजवत होता. ओळख पटवण्यात झालेल्या चुकीमुळे सुरक्षा रक्षकांना हा हल्ला वाटला आणि त्यातूनच ही घटना घडली,” अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.


काश्मीरमधील अनेक मंदिरांना पोलिसांचा पहारा आहे. ही घटना काश्मीरमधील सुरक्षेतील गोंधळाचं आणखी एक उदाहरण आहे. याआधी अनेक सुरक्षा जवानांकडून रात्रीच्या वेळी चुकून सामान्य नागरिकांची हत्या झाली आहे.