जगभरातील एकूण करोना रुग्णांची संख्या २५ कोटींवर पोहोचली आहे. तर, जगभरात ५० लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तसेच ७.२४ अब्जांपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने ही आकडेवारी जारी केली आहे. रविवारी सकाळी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण रुग्णसंख्या २५ कोटी ६ लाख १० हजार ४५२वर आहे, तर मृतांची संख्या ५० लाख ४८ हजार ८६५ झाली असून आतापर्यंत ७ अब्ज २४ कोटी ६६ लाख ४ हजार १६४ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

आकडेवारीनुसार, अमेरिका हा जगातील सर्वाधिक ४ कोटी ६४ लाख ८७ हजार ७४० रुग्णसंख्या आणि ७ लाख ५४ हजार ४२९ मृत्यूंसह सर्वात जास्त प्रभावित देश आहे. तर, संसर्गाच्या बाबतीत, भारत ३ कोटी ४३ लाख ५५ हजार ५०९ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि २ कोटी १८ लाख ८० हजार ४३९ रुग्णसंख्येसर ब्राझील तिसऱ्या स्थानावर आहे. ३० लाखांहून अधिक रुग्णसंख्या असलेल्या इतर देशांमध्ये अमेरिका, रशिया, तुर्की, फ्रान्स, इराण, अर्जेंटिना, स्पेन, इटली, जर्मनी, इंडोनेशिया, मेक्सिको, युक्रेन आणि पोलंडचा समावेश आहे.

१ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत ब्राझील ६ लाख ९ हजार ४४७, भारत ४ लाख ६० हजार ७९१, मेक्सिको २ लाख ८९ हजार ६७४, रशिया २ लाख ४२ हजार २४१, पेरू २ लाख ४०९, इंडोनेशिया १ लाख ४३ हजार ५१९, युके १ लाख ४२ हजार २३६, इटली १ लाख ३२ हजार ३९१, कोलंबिया, १ लाख २७ हजार ५३३, इराण १ लाख २७ हजार २९९, फ्रान्स १ लाख १८ हजार ८६६ आणि अर्जेंटिना १ लाख १६ हजार १०४चा समावेश आहे.