देशात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २८ हजार ३२६ करोनाबाधित आढळले असून २६० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, २६ हजार ३२ जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३ कोटी २९ लाख २ हजार ३५१ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ लाख ४६ हजार ९१८ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

देशातील सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून सध्या ३ लाख ३ हजार ४७६ रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही १ टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९७.७७ टक्क्यांवर आहे. देशभरात गेल्या २४ तासांत ६८ लाख ४२ हजार ७८६ जणांचं लसीकरण करण्यात आलंय. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८५ कोटी ६० लाख ८१ हजार ५२७ लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय.

महाराष्ट्रातील परिस्थिती..

राज्यात शनिवारी दिवसभरात ३ हजार ७२३ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ३ हजार २७६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, राज्यात ५८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतीपर्यंत एकूण ६३,६०,७३५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२४ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८८३४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.