चीनमध्ये पुन्हा करोना संकट!, बीजिंगसहित १५ शहरात डेल्टा व्हेरिएंट विषाणूचा फैलाव

चीन करोनावर मात करण्यात यशस्वी ठरल्याचं भासवत होता. मात्र गेल्या काही दिवसात चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

China-Corona
चीनमध्ये पुन्हा करोना संकट!, बीजिंगसहित १५ शहरात डेल्टा व्हेरिएंट विषाणूचा फैलाव (Photo- Reuters)

चीनमधून पसरलेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं. चीन करोनावर मात करण्यात यशस्वी ठरल्याचं भासवत होता. मात्र गेल्या काही दिवसात चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण वाढलं आहे. राजधानी बीजिंगसहित १५ शहरात करोनाचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. राजधानी बीजिंगमध्ये करोना रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. जवळपास २.२ कोटी लोकसंख्या असलेल्या बीजिंगमध्ये १ जुलैला चीनी कम्युनिस्ट पार्टीचा शताब्दी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी गेले कित्येक महिने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता बीजिंगमध्ये रुग्ण आढळल्याने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी तातडीची बैठक बोलवून उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.

पूर्व चीनमधील जिआंगसू प्रांताची राजधानी असलेल्या नानजिंग विमानतळावरील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर वेगाने फैलाव झाला आहे. २० जुलैला जवळपास २०० जणांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर ११ ऑगस्टपर्यंत या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. करोनाचे वाढते रुग्ण पाहता या भागात अंशत: निर्बंध लादण्यात आले आहेत.

दहा राज्यात करोनाचा प्रकोप!; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

कुठून फैलाव झाला?

नानजिंग विमानतळावर कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हा फैलाव झाल्याचं आरोग्य विभाागचं म्हणणं आहे. १० जुलैला रशियातून चीनमध्ये आलेल्या विमानात हा कर्मचारी कार्यरत होता, असं वृत्त बीबीसीने दिलं आहे. सफाई कर्मचाऱ्याने करोनाचे नियम पाळले नसल्याने फैलाव झाल्याचं झिनुआ न्यूज रिपोर्टने सांगितलं आहे. या बाबत स्थानिक प्रशासनाने विमान प्राधिकरणाला जबाबदार धरलं आहे.

काय! ‘करोना केअर फंड योजने’तून प्रत्येकाला मिळणार ४ हजार?; ‘त्या’ मेसेज मागील सत्य काय?

चीनची करोना लस अकार्यक्षम?

चीनमध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने चीन निर्मित लसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटवर ही लस अकार्यक्षम असल्याचं बोललं जात आहे. त्यात किती जण लस घेऊनही संक्रमित झाले आहेत, याबाबतची माहिती नाही. दुसरीकडे दक्षिण-पूर्व आशियाई देशांनी चीनची लस घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona crisis in china again delta variant virus spreads to 15 cities including beijing rmt

ताज्या बातम्या