करोना मातेची मास्क लावलेली मूर्ती आणि दर्शनासाठी ग्रामस्थांची रांग; मातेचा आवडता रंग पिवळा!

उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात ग्रामस्थांनी मिळून करोना मातेचं मंदिर उभारलं असून तिथे करोनाला पिटाळून लावण्याचं मागणं ग्रामस्थ घालतात!

corona mata temple in uttar pradesh
उत्तर प्रदेशमध्ये बांधण्यात आलेलं करोना मातेचं मंदिर

श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी असं नेहमीच बोललं जातं. पण कधीकधी या अंधश्रद्धेचाही कडेलोट होतो आणि उत्तर प्रदेशमधल्या या मंदिरासारखी परिस्थिती जन्म घेते! उत्तर प्रदेशच्या या गावामध्ये ग्रामस्थांनी स्वत:हून पुढाकार वर्गणी काढून स्थापन केली आहे करोना मातेची मूर्ती! या मूर्तीची रोज पूजा-अर्चा केली जाते. करोना मातेला नैवेद्य, फुलांचा साज चढवला जातो. आणि मागणं घातलं जातं तिच्याच नावाने असलेल्या (खरंतर तिला नाव ज्याच्यावरून पडलं अशा) करोनाला पिटाळून लावण्याचं! या सगळ्यामध्ये कुठेही अविश्वास किंवा चुकीचं काही केल्याचा लवलेशही ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर नसतो. त्यांच्यासाठी करोना माताच या महाभयंकर संकटातून मानवजातीचं संरक्षण करू शकेल! आता ही त्यांची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की त्याचाही कडेलोट आहे, हा मात्र चर्चेचा विषय ठरू शकेल!

फक्त पिवळ्या रंगाचीच फुलं, प्रसाद वाहण्याची परवानगी!

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधल्या शुक्लपूर गावातला हा प्रकार. गावातल्या एका मोठ्याशा कडुलिंबाच्या झाडाखाली आहे करोना मातेचं मंदिर. या मंदिरात करोना माता म्हणून एका मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीला मास्क देखील घातलेला आहे. या मूर्तीच्या मागच्या भिंतीवर करनाबाबतचे सर्वात महत्त्वाचे उपाय दिलेले आहेत. यामध्ये मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं लिहिण्यात आलं आहे. शिवाय, करोना मातेला फक्त पिवळी फुलं, पिवळी फळं, पिवळ्या रंगाचा गोड नैवेद्य किंवा इतर कोणत्याही गोष्टी पिवळ्या रंगाच्याच चालतात!

corona mata temple in uttar pradesh village
नियमांचं पालन करून ग्रामस्थ घेतात दर्शन!

ग्रामस्थ करतात नियमांचं पालन

करोनाच्या या महाभयंकर साथीमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे लोकांना या संकटातून वाचवण्याच्या भावनेतून ग्रामस्थांनी गावातल्या कडुलिंबाच्या झाडाखाली हे करोना मातेचं मंदिर उभारलं आहे. यासाठी गावकऱ्यांनीच वर्गणी काढून हा पुढाकार घेतला. पण प्रार्थना करायची म्हणजे गर्दी करायची, हे मात्र या मंदिरात दिसत नाही. करोना मातेचं दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ देखील शिस्तीत करोनाचे सर्व नियम पाळूनच उभे राहतात.

करोना देवी की जय… रुग्णसंख्या वाढल्याने केली करोना देवीची प्रतिष्ठापना; ४८ दिवस चालणार महायज्ञ

तामिळनाडूमध्येही करोना देवीचं मंदिर!

याआधी देखील अनेकदा देवी, प्लेग, कॉलरा अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी या आजारांच्या नावाने मंदिरं उभारल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यातच तामिळनाडूच्या कोयम्बतूरमध्ये करोना देवीचं मंदिर बांधण्यात आलं होतं. कोयम्बतूरमधील करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवच मदतीला धावून येऊ शकतो, या भावनेतून हे मंदीर बांधण्यात आलं होतं. दीडशे वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीच्या वेळेस प्लेग मरियम्मन मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. शहराच्या बाहेरील इरुगुरमधील कामत्विपुरी अधीनम नावाच्या मठाने या मंदिराची स्थापना केलीय. या मंदिरात करोना देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona mata temple in uttar pradesh village to get rid of covid 19 pandemic pmw

ताज्या बातम्या