करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या नियंत्रित विभागाबाहेरील छोटय़ा जिल्ह्यंमध्ये एक टक्क्यापेक्षाही कमी लोकांना करोनाची बाधा झाली आहे. शहरांमध्ये विशेषत: शहरांतील झोपडपट्टय़ांमध्ये व नियंत्रित विभागांमध्ये हे प्रमाण तुलनेत अधिक आहे. मात्र, देशात समूह संसर्ग झालेला नाही, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘आयसीएमआर’ने देशातील ८३ छोटय़ा जिल्ह्यंमध्ये करोनाचा प्रादुर्भाव किती झाला आहे, हे तपासण्यासाठी सर्वेक्षण (सिरो सव्र्हे) केले असून त्याचे निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आले. करोनाबाधितांचे प्रमाण जेमतेम ०.७८ टक्के असल्याचे आढळले. सर्वेक्षणातील निरीक्षणानुसार, करोनाची बाधा होण्याची शक्यता ग्रामीण भागांपेक्षा शहरी झोपडपट्टय़ांमध्ये १.८९ पटीने जास्त आहे. शहराच्या अन्य भागात ही शक्यता १.०९ पटीने अधिक आहे. सर्वेक्षणानुसार संबंधित जिल्ह्यंमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.०८ टक्के होते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टाळेबंदीचा वापर यशस्वी ठरला आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव आणि वाढीचा वेग आटोक्यात ठेवता आला. पण, देशातील मोठी लोकसंख्या करोनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी नमुना चाचण्या करणे, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, देखरेख ठेवणे हे उपाय कायम ठेवावे लागणार आहेत, असे भार्गव म्हणाले.
सुमारे ३ लाख रुग्ण
गेल्या २४ तासांमध्ये ९,९९६ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्ण संख्या दोन लाख ८६ हजार ५७९ इतकी झाली आहे. सलग नवव्या दिवशी नऊ हजारहून अधिक रग्ण वाढले. एकूण ८,१०२ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये एका दिवसातील सर्वात जास्त म्हणजे ३५७ मृत्यू नोंदवले गेले. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४९.२१ टक्के झाले असून ते बुधवारी ४८.३७ टक्के होते. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या गुरुवारीही जास्त होती. उपचाराधीन रुग्ण १.३७ लाख व बरे झालेले रुग्ण १.४१ लाख इतके आहेत.
मदत क्रमांकाशी संपर्क साधा
करोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी वा संशयित रुग्णांनी राज्याने दिलेल्या मदत क्रमांकांशी संपर्क साधावा व त्यांच्या मार्गदर्शकाखाली उपचार घेण्यासाठी संबंधित रुग्णालयात जावे. राज्यांनीही मदत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे व लोकांना मदत देण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सांगितले. अनेक ठिकाणी रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करून घेतले जात नाही व वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर केंद्राकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले.
हर्षवर्धन यांच्याकडून राज्याचा आढावा
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अनिल देशमुख तसेच, करोनाप्रभावित ३६ जिल्ह्यंचे जिल्हाधिकारी यांच्याशी चित्रवाणीसंवादाद्वारे संपर्क साधला व राज्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, नागपूर आणि औरंगाबाद या सात जिल्ह्यंतील करोना नियंत्रणाच्या स्थितीची सविस्तर माहिती हर्षवर्धन यांनी घेतली. गरज असेल तर नियंत्रित विभागामध्ये वाढ करा व लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ठिकाणांवर अधिक लक्ष्य केंद्रीत करा. एक लाख लोकांमागे किती नमुना चाचण्या केल्या जात आहेत व किती मृत्यू होत आहेत, यावरही लक्ष ठेवावे लागेल व त्यानुसार नियंत्रणाचे उपाय करावे लागतील. तसेच, कृत्रिम श्वासोच्छवासाची यंत्रे, वैद्यकीय प्रयोगशाळा आदी वैद्यकीय सुविधा आवश्यकतेनुसार वाढण्याची सूचनाही हर्षवर्धन यांनी केली.
