नवी दिल्ली : देशात गेल्या एका दिवसात आणखी दोन लाख ७६ हजार ११० जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ५७ लाख ७२ हजार ४४० वर पोहोचली आहे. तर चार दिवसांनंतर प्रथमच मृतांची दैनंदिन संख्या चार हजारांहून कमी झाली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या २४ तासांत ३८७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे मृतांची एकूण संख्या दोन लाख ८७ हजार १२२ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या ही संख्या ३१ लाख २९ हजार ८७८ इतकी आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८६.७४ टक्क्यांवर गेले आहे. करोनातून आतापर्यंत दोन कोटी २३ लाख ५५ हजार ४४० जण बरे झाले आहेत. मृत्युदर १.११ टक्के इतका आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडे २ कोटी लस मात्रा

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही जवळपास दोन कोटी लशीच्या मात्रा उपलब्ध आहेत, आणखी २६ लाख मात्रा तयार असून त्या येत्या तीन दिवसांत उपलब्ध करून दिल्या जातील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले. देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करोना लशी विनामूल्य उपलब्ध करून देत  आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत विनामूल्य वर्गवारीतील आणि राज्यांकडून थेट खरेदी वर्गवारीद्वारे २१ कोटींहून अधिक मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यापैकी १९ कोटी नऊ लाख ६० हजार ५७५ मात्रांचा (वाया गेलेल्या लशींसह) वापर करण्यात आला आहे, असेही आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.