scorecardresearch

दक्षिण कोरियात कोरोनाचा स्फोट, एका दिवसात तब्बल ६ लाख २१ हजार नवे रुग्ण

दक्षिण कोरियाच्या आरोग्य विभगाने मार्चच्या मध्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती.

corona
फाईल फोटो

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि जगभरात कोरोना संसर्ग कमी झाला होता. रुग्णसंख्या घटल्यामुळे भारतात कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून चीन तसेच काही आफ्रिकन देशांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दक्षिण कोरियामध्ये तर एका दिवसामध्ये तब्बल ६ लाख २१ हजार ३२८ नवे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.

एका दिवसात ४२९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

दक्षिण कोरियामध्ये येथे एका दिवसात तब्बल ६ लाख २१ हजार ३२८ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच एका दिवसात येथे तब्बल ४२९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता जभगरात कोरोनाची लाट येते की काय ? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान दक्षिण कोरियामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८२ लाख ५० हजार ५९२ वर पोहोचली आहे.

अपेक्षापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत

दक्षिण कोरियाच्या आरोग्य विभगाने मार्चच्या मध्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. आरोग्य विभागाने मार्चमध्ये १ लाख ४० हजार ते २ लाख ७० हजारच्या आसपास रुग्ण सापडतील असे भाकित केले होते. मात्र येथे अपेक्षापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत असून आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

हे फक्त हीमनगाचे टोक

दरम्यान गेल्या आठवड्यापासून चीन तसेच इतर अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. “काही देशांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. हे चिंताजनक आहे. तसेच आता जे आकडे समोर येत आहेत, ते फक्त हीमनगाचे टोक आहे,” असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्यांच वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona patients increased in south korea 6 lakh corona patients found in one day prd

ताज्या बातम्या