यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी करोना नियमांसोबतच; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

Ganesh-Festival-Corona1
(Express Photo by Arul Horizon)

देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. करोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी करोना नियमांसोबत साजरी करावी लागणार आहे. लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि करोनाचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

“करोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. करोना रुग्णसंख्येत नेहमीत सणासुदीनंतर वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे”, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं. “लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरी मास्क आणि करोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. केरळमधील करोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. “सध्या देशात रोज येणाऱ्या करोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण आहेत”, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

उत्सव काळात गर्दी टाळणं आवश्यक आहे. गर्दीमुळे करोना अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. “सणासुदीच्या काळात अनिवार्य गर्दीच्या ठिकाणी दोन लस घेण्याची अट असावी.”, असं इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं.

देशात गेल्या अनेक दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्के आहे. बुधवारी देशात ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार १५९ जण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा खाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona second wave still on says health ministry rmt