करोनाचे संकट अद्याप देशभर कायम आहे. गेल्या सलग सहा दिवसांपासून ४० हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४०,१३४ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ करोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. केरळमध्ये सर्वाधिक २०,७२८ नवीन बाधित आढळून आले आहेत. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,९४६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

गेल्या २४ तासांत देशात ४०,१३४ नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ४२२ करोनाबाधितांचा मृत्य झाला आहे. ३६,९४६ रुग्णांनी करोनावर मात करुन ते घऱी परतले आहेत. देशात केरळमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही आहे. सहाव्या दिवशीही केरळमध्ये २० हजारांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये, कोविडची २०,७२८ नवीन बाधितांची नोंद झाल्याने एकूण संक्रमित लोकांची संख्या ३४,११,४८९ झाली. त्याचबरोबर, आणखी ५६ रूग्णांच्या मृत्यूनंतर, करोनामुळे मृतांची संख्या १६,८३७ वर पोहोचली आहे. २७ जुलैपासून केरळमध्ये करोनाची १,२८,३७३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ ऑगस्टपर्यंत देशभरात करोना लसीचे ४७ कोटी २२ लाख डोस देण्यात आले आहेत. रविवारी १७ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मते, आतापर्यंत ४६ कोटी ९६ लाख करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी सुमारे १४ लाख करोना नमुने चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.