गेल्या अडीच वर्षापासून भारतात आणि जगभरात ठाण मांडून बसलेल्या करोनाचं अस्तित्व गेल्या काही दिवसांमध्ये उरलंच नसल्याचा समज निर्माण व्हावा अशी परिस्थिती आसपास दिसू लागली आहे. एकीकडे रशिया-युक्रेनमधलं युद्ध आणि दुसरीकडे भारतात पाच राज्यांमधल्या निवडणुका, महाराष्ट्रात नवाब मलिक राजीनामा प्रकरण या सगळ्यामुळे करोना खरंच उरलाय का? असा प्रश्न पडण्यासारखं चित्र उभं राहिलं असतानाच देशातील ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञांनी करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य वाढ यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक डॉ. टी. जेकब जॉन्स यांनी करोनाची तिसरी लाट आणि चौथ्या लाटेची येण्याची शक्यता यासंदर्भात महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडलं आहे. पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे.
तिसरी लाट संपली?
डॉ. जेकब जॉन्स यांनी भारतात तिसरी लाट संपुष्टात आल्याचं निरीक्षण मांडलं आहे. “माझं वैयक्तिक मत आहे की तिसरी लाट आता संपली आहे. दररोज नोंद होणारी बाधितांची कमी आणि स्थिर संख्या याचं प्रमाण असल्याचं माझं मत आहे. किमान चार आठवडे हेच चित्र दिसल्यामुळे मी हा निष्कर्ष काढला आहे. भारतातील सगळ्याच राज्यांमध्ये हे चित्र दिसत आहे”, असं जॉन्स म्हणाले.
चौथ्या लाटेचं काय?
डॉ. जेकब जॉन्स यांनी चौथ्या लाटेसंदर्भात देखील भूमिका मांडली आहे. “भारतात चौथ्या लाटेची शक्यता फारच कमी आहे”, असं जेकब म्हणाले आहेत. “अल्फा, बीटा, गामा किंवा ओमायक्रॉन यापेक्षा एकदम वेगळाच व्हेरिएंट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत देशात चौथ्या लाटेची भीती नाही. कोविडचा विषाणू सातत्याने स्वत:मध्ये बदल करत नवनवे व्हेरिएंट तयार करतोय. पण यातले काहीच व्हेरिएंट काही प्रमाणात बाधितांची संख्या वाढवू शकतात”, असं डॉ. जेकब जोन्स यांनी नमूद केलं आहे.
आकडेवारी काय सांगते?
मंगळवारी भारतात एकूण ३ हजार ९९३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. ही संख्या गेल्या ६६२ दिवसांमध्ये सर्वात कमी होती.
सुमारे ४०० करोनायोद्धय़ांना कार्यमुक्त करणार
दरम्यान, डॉ. जेकब जोन्स यांनी देशात सातत्याने तपासणी आणि जेनोम सिक्वेन्सिंग करत राहण्याची गरज यावेळी व्यक्त केली. जेणेकरून करोनाचा कोणताही विषाणू दुर्लक्षित होणार नाही.