देशात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. देशात गेल्या २४ तासांत १५ हजार ९०६ करोनाबाधित आढळले असून ५६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या लसीकरणामुळे करोनाची प्रकरणे कमी झालेली दिसत आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९८.१७ टक्के झाला आहे. हा दर मार्च २०२० म्हणजे तब्बल दीड वर्षानंतरचा सर्वाधिक आहे. नवीन आढळणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असलेल्या सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.

गेल्या २४ तासांत देशात १६ हजार ४७९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात १ लाख ७२ हजार ५९४ सक्रिय रुग्ण आहेत. नवीन रुग्णसंख्येसह देशातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ३ कोटी ४१ लाख ७५ हजार ४६८ झाली आहेत. तर, आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख ४८ हजार ६०५ रुग्ण बरे झाले आहेत. करोनाचा विकली पॉझिटिव्हीटी रेट १.२३ टक्के आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ७७ लाख ४० हजार ६७६ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशातील १०२.१० कोटी लसीचे डोस पूर्ण झाले आहेत.