देशातील १५ ते १८ वयोगटातील ५० टक्के मुलांनी करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. देशातील तरुणाईचा लसीकरणाचा एक टप्पा पूर्ण होणे हे प्रेरणादायी आहे, असे मंडाविया म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. दोन आठवड्यांतच निम्म्याहून अधिक मुलांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. करोनाशी लढा देणाऱ्या भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे, असे मंडाविया यांनी सांगितले. ‘शाब्बास माझ्या तरुण मित्रांनो! लसीकरणाबाबत असलेला तुमचा उत्साह देशातील अन्या नागरिकांना प्रेरणा देणारा आहे,’ असे कौतुकोद्गार आरोग्यमंत्र्यांनी काढले.

१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

‘युवा भारता’चे दर्शन- पंतप्रधान

१५ ते १८ या वयोगटातील निम्म्याहून अधिक मुलांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतली असून या लसीकरण मोहिमेमुळे ‘युवा भारत’ दिसून आला, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले. सध्या आपण सर्वच जण करोना महासाथीशी लढा देत आहोत. निम्म्याहून अधिक किशोरवयीन मुलांनी करोना प्रतिबंधक लस घेतल्याचे वृत्त या काळात उत्साहवर्धक असून केंद्राच्या मोहिमांना चालना देणारे आहे, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले. करोना प्रतिबंधक लस घेणे आणि करोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona vaccination age 15 to age 18 50 percent children first corona vaccine dose akp
First published on: 20-01-2022 at 00:16 IST