केंद्र सरकारचे एक पॅनल देशात बूस्टर डोस आणि मुलांसाठी लस यावरील धोरण दोन आठवड्यात निश्चित करण्याची शक्यता आहे. किरकोळ आजारांना बळी पडणाऱ्या मुलांसाठी लसीकरण प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होऊ शकते. तसेच, पुढील आठवड्यात सरकारचा उच्च सल्लागार गट मुलांच्या लसीकरणासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे देखील सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने ही माहिती दिली आहे.

तसेच, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची (NTAGI) पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीत कोविड-19 लसीचे अतिरिक्त डोस म्हणजेच बूस्टर डोस देण्यावरही सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला जाऊ शकतो, असे देखील मानले जात आहे.

आजाराने ग्रस्त बालकांचे लसीकरण जानेवारीमध्ये सुरू होऊ शकते. मार्चपर्यंत इतर सर्व मुलांसाठी लसीकरण सुरू होऊ शकते. सरकार सध्या हर घर दस्तक मोहिमेद्वारे करोनाच्या दोन्ही लसी सर्वांना देण्याची तयारी करत आहे.

जगातील अनेक देशांमध्ये ज्या नागरिकांनी करोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना बूस्टर डोस दिला जात आहे. या यादीत अमेरिका, जर्मनी, इस्रायलसह अनेक देशांचा समावेश आहे. अमेरिका, युरोपमधील मुलांनाही करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक देशांमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोविडची लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्याला भारतात अद्याप मान्यता मिळालेली नाही. Covaccine, Zydus Cadila यासह अनेक कंपन्या मुलांसाठी करोनाची लस बनवण्यात गुंतल्या आहेत. त्याचवेळी, भारतातील आरोग्य तज्ञ गंभीरपणे आजारी, वृद्ध, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना करोना लसीचे बूस्टर डोस देण्याचा सल्ला देत आहेत.